मार्लोव : लालरेमसयानी हिने केलेल्या अप्रतिम गोलाच्या जोरावर भारताने महिलांच्या हॉकी सामन्यात इंग्लंडला 1-1 असे बरोबरीत रोखले. या दौऱ्यातील भारताचा हा दुसरा सामना आहे.
अटीतटीने झालेल्या सामन्यात पहिल्या दोन मिनिटांत भारताला पेनल्टी कॉर्नरच्या दोन संधी वाया घालविल्या. इंग्लंडच्या खेळाडूंनीही धारदार आक्रमण केले. भारतीय खेळाडूंनी चांगला बचावही केला. मात्र, 8 व्या मिनिटाला इंग्लंडला पेनल्टी स्ट्रोक मिळाला. त्याचा फायदा घेत त्यांनी गोल नोंदविला. या गोलाच्या आधारे त्यांनी पूर्वार्धात आघाडी घेतली होती.
उत्तरार्धात भारतीय खेळाडूंनी जोरदार आक्रमणास प्रारंभ केला. त्याचा त्यांना लगेचच फायदा मिळाला. लालरेमसयानी हिने इंग्लंडच्या बचावरक्षकांना चुकवित गोल केला आणि 1-1 अशी बरोबरी साधली. त्यानंतर दोन्ही संघांच्या खेळाडूंनी आघाडी मिळविण्यासाठी कसोशीने प्रयत्न केले. तथापि दोन्ही संघ आघाडी घेण्यात अपयशी ठरले. त्यामुळे हा सामना बरोबरीत सुटला.