इंडिया ओपन सुपर स्पर्धा स्थगित

नवी दिल्ली -टोकियो ऑलिम्पिकमधील शेवटच्या तीन पात्रता स्पर्धांपैकी एक असलेली इंडिया ओपन सुपर स्पर्धा स्थगित करण्यात आली आहे. देशात करोनाचा संसर्ग वाढल्याच्या पार्श्‍वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती बॅडमिंटन असोसिएशन ऑफ इंडियाचे (बीएआय) सरचिटणीस अजय सिंघानिया यांनी दिली.

ही स्पर्धा दि. 11 ते 16 मे दरम्यान पार पडणार होती. अजय सिंघानिया म्हणाले, देशात करोनाची दुसरी लाट आली असून करोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सध्या देशातील परिस्थिती कठीण असल्याने ही स्पर्धा स्थगित करण्याशिवाय बीएआयकडे अन्य कोणताही पर्याय नव्हता.

या स्पर्धेत 228 खेळाडू सहभागी होणार होते. तसेच प्रशिक्षक आणि अधिकारी यांच्यासह सुमारे 300 जण एकत्रित येणार होते. यामुळे अशा परिस्थितीत धोका पत्करणे योग्य नव्हता. यासंदर्भात बीएआयने दिल्ली सरकार आणि अन्य सदस्यांशी चर्चा केली. त्यानंतर खेळाडूंसह अधिकाऱ्यांच्या सुरक्षिततेचा विचार करता स्पर्धा स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला.

दरम्यान, यापूर्वी मलेशिया सुपर आणि सिंगापूर सुपर या स्पर्धाही स्थगित करण्यात आल्या होत्या. तसेच ऑलिम्पिक विजेती कॅरोलिना मारिनसह अनेक आघाडीच्या बॅडमिंटनपटूंनी यापूर्वीच स्पर्धेतून माघार घेतलेली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.