नवी दिल्ली – करोनाचा धोका अद्याप कायम असल्यामुळे जागतिक बॅडमिंटन महासंघाने इंडियन ओपन व सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा रद्द केली आहे.
मूळ वेळापत्रकानुसार इंडियन ओपन स्पर्धा मार्च महिन्यात होणार होती. मात्र, त्याचवेळी करोनाचा धोका वाढल्याने ही स्पर्धा 8 ते 13 डिसेंबर या कालावधीत नवी दिल्लीत होणार असे सांगण्यात आले होते. तसेच सय्यद मोदी स्पर्धा 17 ते 22 नोव्हेंबरदरम्यान लखनौ येथे होणार होती. मात्र, करोनाचा धोका अद्याप कायम असल्याने खेळाडूंच्या आरोग्याला प्राधान्य देत या दोन्ही स्पर्धा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
याबाबत महासंघाने सर्व संलग्न देशांच्या संघटनांना माहिती दिली असून संघटनांनी महासंघाने दिलेल्या सर्व सूचनांचे पालन करणे बंधनकारक करण्यात आले आहे. टोकियो ऑलिम्पिकचे पात्रता निकष मात्र, स्पर्धा रद्द झाल्यानंतरही कायम ठेवण्यात येणार आहेत.