भारताचा पुन्हा एकदा पाकवर निशाणा; UNHRC मध्ये दहशहतवाद्यांना पेन्शन देत असल्याचा आरोप

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताने पुन्हा एकदा पाकिस्तानच्या कुकृत्याचे पितळ उघडे पडले आहे.  पाकिस्तानमध्ये दहशतवाद्यांना आयुष्याच्या शेवटी पेन्शन देण्याचा प्रकार होत असल्याचे भारताने म्हटले आहे. मंगळवारी जिनेव्हामधील संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार परिषदेमधील एका सत्रात भारताने काश्मीरच्या मुद्द्यावरुन आणि एका वार्षिक अहवालासंदर्भात भाष्य करताना पाकिस्तानवर टीका केली.

दहशतवाद्यांना मदत करणे तसेच दहशतवादाला पाठिंबा देण्यासाठी पाकिस्तानला जागतिक स्तरावर जबाबदार धरण्याची वेळ आल्याचे यावेळी भारताकडून सांगण्यात आले आहे.  शक्तीचा वापर करुन लोकांकडून हवं ते वदवून घेणं, हत्या करणे आणि राजकीय कार्यकर्ते तसेच अल्पसंख्यांकाना वाटेल त्या पद्धतीने अटक करण्याच्या प्रकरणांचाही भारताने उल्लेख केला.

संयुक्त राष्ट्रांमध्ये भारताच्या कायमस्वरुपी मोहिमेचे प्रथम सचिव पवन कुमार बाधे यांनी भारताची भूमिका स्पष्ट केली. “दहशतवाद मानवाधिकारांचे उल्लंघन करतो. सर्व प्रकारच्या दहशतवादाविरोधात कठोरपणे लढण्याची आवश्यकता आहे,” असे पवन कुमार बाधे यांनी भारताची भूमिका मांडताना सांगितले.


“पाकिस्तान आपल्या राष्ट्रीय धोरणांच्या नावाखाली धोकादायक आणि दहशतवादी घोषित करण्यात आलेल्यांना पेन्शन देतो. तसेच या लोकांना पाकिस्तान आश्रय देतो. त्यामुळे आता पाकिस्तानला दहशतवाद्यांना मदत करणे आणि दहशतवादवाढीसाठी जबाबदार ठरवण्याची वेळ आलीय,” असे म्हणत बाधे यांनी पाकिस्तानवर टीका केली. उत्तर देण्याच्या अधिकाराचा वापर करत भारताने आपली बाजू मांडली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.