मस्कत (ओमान) – भारत आणि ओमानमधे लवकरच व्यापार आणि गुंतवणूक विषयक मोठा करार केला जाणार आहे. या करारानुसार दोन्ही देश परस्परांच्या व्यापारी संबंधांना मजबूत करण्याच्या उद्देशाने एकमेकांच्या उत्पादनांवरील आयात शुल्कात कपात करतील.ओमानचे सुलतान हैथम बिन तारिक यांनी एक वर्षापूर्वी भारताचा दौरा केल्यानंतर दोन्ही देशांमधील व्यापक आर्थिक भागीदारी करारासाठीच्या वाटाघाटींची व्याप्ती अधिकच वाढली आहे.
भारताबरोबरतच्या व्यापारी कराराला या वर्षात अंतिम रुप दिले जाईल, अशी ओमानला आशा आहे, असे ओमानचे वाणिज्य मंत्री कैस बिन मोहम्मद अल-युसेफ यांनी वृत्तसंस्थेला सांगितले. गेल्या काही वर्षांत दोन्ही देशांमधील आर्थिक संबंधांमध्ये मोठी वाढ झाली आहे, भारत ओमानच्या प्रमुख व्यापारी भागीदारांपैकी एक म्हणून उदयास येत आहे. २०२३ मध्ये ओमानच्या कच्च्या तेलाच्या निर्यातीसाठी दक्षिण कोरियानंतर भारत चौथा सर्वात मोठा आयातदार देश होता. ओमानच्या तेलाव्यतिरिक्त निर्यातीसाठी २०२३ मध्ये सौदी अरेबियानंतर भारत तिसरा सर्वात मोठा ग्राहक होता.
दिनांक १३ आणि १४ जानेवारी रोजी नवी दिल्लीत वाटाघाटींचा एक नवीन टप्पा पार पडला आणि अनेक क्षेत्रांमध्ये प्रगती झाल्याचे कळते आहे. ओमान भारतासोबत एकूण व्यापारी संबंध वाढविण्यास उत्सुक आहे आणि भारतीय गुंतवणूकदारांकडून ओमानमध्ये खूप रस आहे, असे अल-युसेफ म्हणाले.