नवी दिल्ली – भारत आणि न्यूझीलंड परस्पर फायदेशीर मुक्त व्यापार कराराला अंतिम स्वरूप देण्यासाठी काम करत आहेत, अशी माहिती वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी भारत आणि न्यूझीलंडच्या मुख्य कार्यकारी अधिकार्यांना संबोधित करताना दिली. दोन्ही देशांनी या आठवड्याच्या सुरुवातीलाच या मुक्त व्यापार करारावर वाटाघाटी सुरू करण्याची घोषणा केली होती. या कार्यक्रमाला न्यूझीलंडचे व्यापार मंत्री टॉड मॅकक्ले, दोन्ही देशांचे व्यावसायिक प्रमुख आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
गोयल यांनी भारत-न्यूझीलंड भागीदारीसाठी एक महत्त्वाकांक्षी दृष्टिकोन मांडला, ज्यात पुढील दशकात द्विपक्षीय व्यापारात 10 पट वाढ करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. दोन्ही अर्थव्यवस्थांमध्ये संबंध मजबूत करण्यात व्यवसायांची भूमिका महत्त्वाची आहे.
हे ध्येय साध्य करण्यासाठी योगदान देण्याचे आवाहन वाणिज्य मंत्र्यांनी दोन्ही देशांतील व्यावसायिक प्रमुखांना केले. आपल्या विकासाच्या वेगवेगळ्या पातळ्या पाहता, कृषी-तंत्रज्ञान, दुग्धव्यवसाय, अन्न प्रक्रिया, औषधनिर्माण, नवीकरणीय ऊर्जा, महत्त्वपूर्ण खनिजे, वनीकरण, फलोत्पादन, पर्यटन आणि क्रीडा क्षेत्रात सहकार्याच्या अमर्याद शक्यता आहेत, असे ते म्हणाले.
गोयल यांनी भारत आणि न्यूझीलंडमधील संबंध मजबूत करण्यात पर्यटन उद्योगाची भूमिका अधोरेखित केली. जिथे कायद्याचे राज्य असते आणि व्यवसायांना योग्य संधी मिळतात, अशा लोकशाही देशांबरोबर काम करण्याचे महत्त्व गोयल यांनी अधोरेखित केले. भारत दरवर्षी सर्वाधिक विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित विषयातील पदवीधरांची निर्मिती करतो, त्यापैकी 43% महिला आहेत. यातून भारताच्या कार्यबलाची विविधता आणि ताकद प्रदर्शित होते, असे गोयल यांनी सांगितले.