#JWC2021 | भारताचा सलामीलाच फ्रान्सकडून पराभव

दोन गोलच्या आघाडीनंतर अत्यंत निराशाजनक कामगिरी

भुवनेश्‍वर – भारतीय संघाने येथे बुधवारपासून सुरू झालेल्या ज्युनिअर विश्‍वकरंडक हॉकी स्पर्धेत सलामीच्याच लढतीत बालढ्य फ्रान्सविरुद्ध अत्यंत निराशाजनक कामगिरी केली. या सामन्यात भारताला 5-4 असे पराभूत करत फ्रान्सने स्पर्धेत विजयी सलामी दिली. आता साखळीत भारतीय संघाला कॅनडा व पोलंडविरुद्धच्या लढती जिंकाव्या लागणार आहेत.

पहिल्याच क्वार्टरमध्ये 2 गोलची आघाडी घेत भारतीय संघाने थाटात सुरुवात केली. मात्र, त्यानंतर भारतीय संघाचा बचाव अत्यंत कमकुवत असल्याचे सिद्ध झाले व फ्रान्सने एकापाठोपाठ गोल केले. पहिल्या हाफमध्ये फ्रान्सने पिछाडी भरून काढताना आणखी एक गोल करत आघाडी घेतली. त्यानंतर संपूर्ण सामन्यात भारतीय खेळाडूंना पुन्हा गोल नोंदवताच आला नाही. फ्रान्सने अखेरच्या क्वार्टरमध्ये आपली आघाडी 5-2 अशी वाढवली. भारतीय संघाला दोन वेळा पेनल्टी कॉर्नर मिळाला होता. मात्र, त्यात त्यांना एकदाही गोल करता आला नाही. अखेरच्या सत्रात भारताने दोन गोल करत ही आघाडी कमी केली. मात्र, तरीही संघाचा पराभव वाचवता आला नाही.

यापूर्वी, फटाक्‍यांच्या नेत्रदीपक आतषबाजीत एका शानदार सोहळ्याने या स्पर्धेचे उद्‌घाटन करण्यात आले. यावेळी येथील कलिंगा स्टेडियमवर ओडीशाचे राज्यपाल गणेश लाल यांनी ज्युनिअर हॉकी विश्‍वकरंडकाचे अनावरण केले. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री नवीन पटनायक, क्रीडा व युवक कल्याण मंत्री तुषारकांत बेहरा, हॉकी महासंघाचे अध्यक्ष नरेंद्र बात्रा आदी पदाधिकारी व खेळाडू उपस्थित होते.

भारताच्या युवा संघाने गेल्या मोसमापासून सातत्याने सरस कामगिरी केली असून यंदाच्या स्पर्धेत ज्युनिअर हॉकी विश्‍वकरंडक आपल्याकडेच राखण्यासाठी कसून तयारीही केली आहे. भारतीय वरिष्ठ पुरुष संघाने यंदा टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत तब्बल 41 वर्षांनंतर पदकाचा दुष्काळ संपवला होता. त्यामुळेच ज्युनिअर संघाच्या खेळाडूंकडूनही भारताला या स्पर्धेत सरस कामगिरीची अपेक्षा आहे.

या स्पर्धेत ऑलिम्पिकपटू विवेक सागर प्रसादच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघातील युवा खेळाडूंना आपली गुणवत्ता सिद्ध करण्याची ही मोठी संधी आहे. या संघालाही वरिष्ठ हॉकी संघाचा कर्णधार मनप्रीत सिंग, गोलरक्षक पीआर श्रीजेश यांच्यासह मुख्य प्रशिक्षक ग्रॅहम रीड यांच्याकडून मार्गदर्शन मिळाले आहे. ही स्पर्धा भारतातच होत असल्याने भारताच्या यशाच्या अपेक्षाही वाढल्या आहेत. आता या स्पर्धेत भारतीय संघाचे पुढील सामने कॅनडा (25 नोव्हेंबर) आणि पोलंड (27 नोव्हेंबर) यांच्याविरुद्ध होणार आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.