जेनेरिक औषधींसाठी जगाची नजर भारताकडे

नवी दिल्ली: मानवाला आरोग्य संपन्न जीवन जगण्यासाठी आहार आणि योग्य व्यायामाची जशी गरज असते, तशीच गरज औषधांची देखील असते. मात्र, त्यांचे दर आवाक्‍यात असणेही आवश्‍यक असते. ते आवाक्‍यात नसले तर गरज असूनही ऐपत नसल्यामुळे औषधापासून वंचित राहिलेल्यांना प्राण गमवावे लागतात. जगातील बऱ्याच गरीब देशांची हीच कथा आहे. या पार्श्‍वभूमीवर जेनेरिक औषधांसह भारत हा आज जगाच्या आशेचा केंद्रबिंदू बनला आहे. या क्षेत्रात भारताने बरीच मोठी मजल मारली असली तरी एकमात्र त्रुटी राहिली आहे. ती म्हणजे औषधांच्या कच्च्या मालासाठी अजूनही आपल्याला चीनवरच अवलंबून राहावे लागत आहे. या संदर्भात सरकारला नव्याने विचार करून पावले उचलावी लागणार आहेत.

करोनाच्या संकटाच्या आताच्या काळात हायड्रोक्‍लोरोक्विनचे नाव बरेच गाजले. अमेरिकेच्या अध्यक्षांनी आपण या गोळ्या घेतल्याची कबुली दिली. त्यानंतर चर्चांना तोंड फुटले व सगळ्या जगाचे भारताकडे लक्ष वेधले गेले. त्याचे कारण आज या गोळ्यांची निर्मिती केवळ भारतातच होते व तीही मोठ्या प्रमाणात होते. गेल्या काही काळापासून भारत काही अशीच औषधे जगभरात निर्यात करतो आहे.

मात्र, दुर्दैवाची गोष्ट ही या औषधांच्या निर्मितीसाठी जो काही कच्चा माल लागतो, त्यातला बराचसा भाग आपल्याला चीनकडून आयात करावा लागतो. लॉकडाऊनच्या या काळात आणि करोनाच्या उगमस्थानावरून आज जगभरात चीनची नाचक्की झाली आहे. बरेच देश चीनाशी फटकून वागत आहेत. शक्‍य तेवढे त्या देशापासून फारकत घेण्याचा प्रयत्न करत आहेत. या काळात भारताला मात्र चीनवर अवलंबून राहावे लागत आहे. हे चित्र लवकरच बदलण्याची गरज आहे.

काय आहे स्वस्त औषधांचे गणित?
जागतिक व्यापार संघटनेने 1995 मध्ये औषधांच्या पेटंटला 20 वर्षे कायदेशीर संरक्षण देण्याचा प्रस्ताव मांडला होता. मात्र, जेव्हा एडस्‌ या आजाराचे संकट अगदी गडद झाले तेव्हा गरीब देशांना औषधे स्वस्तात उपलब्ध होण्याची गरज अधोरेखित झाली. त्यावर डब्लूटीओचे सदस्य देश आपल्या देशातील औषध कंपन्यांच्या औषधांच्या सामान्य आवृत्तीच्या निर्मितीसाठी इतर निर्मिती कंपनींना लायसन्स देऊ शकतात असे डब्लूटीओला वाटले. त्यानुसार सिप्ला या भारतीय कंपनीने 2001 मध्ये अनेक नामांकित कंपन्यांच्या औषधांची रिव्हर्स इंजिनिअयरिंगच्या माध्यमातून निर्मिती करण्याचा अन्‌ एका दिवसासाठी एक डॉलर या मूल्याने ती औषधे गरीब देशांना उपलब्ध करण्याचा प्रस्ताव ठेवला. त्यामुळे या औषधांच्या किमती 96 टक्‍क्‍यांनी कमी होणार होत्या.

जेनेरिक औषध म्हणजे काय?
जेनेरिक औषधे म्हणजे ब्रॅंडेड किंवा नामांकित कंपन्यांच्या औषधांची कॉपी असते व याचे परिणामही सारखेच असतात. म्हणजे रुग्णाला त्यांचा गुण येतो व त्यामानाने या औषधांच्या किमती अत्यंत नगण्य असतात. अमेरिकेतील औषधांच्या बाजारात या जेनेरिक औषधांची व्याप्ती 90 टक्के इतकी असल्याचे एका अहवालातून अगोदरच स्पष्ट झाले आहे. त्याचप्रमाणे वापरल्या जाणाऱ्या तीन औषधांपैकी एक औषध भारतीय कंपनीचे असल्याचेही समोर आले आहे. मात्र, अडचण एवढीच आहे की या औषधांच्या निर्मितीसाठी लागणाऱ्या कच्च्या मालापैकी 68 टक्के माल हा आपण चीनकडून आयात करतो. कोणतेही संकट अथवा आपत्ती आली की या आयातीच्या साखळीवर त्याचा परिणाम होतो व त्याचा परिणाम निर्मितीच्या क्षमतेवर होतो.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×