#ENGvIND : इंग्लंडमधील अपयश भारतीय संघ पुसणार का?

नॉटिंगहॅम – कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी सज्ज होत आहे. आजवर इंग्लंड दौऱ्यात आलेले अपयश यंदा तरी पुसले जाणार का, हाच प्रश्‍न निर्माण झाला आहे. कर्णधार कोहलीसाठी 2014 साली झालेला दौरा फलदायी ठरला होता, त्याने सहाशेपेक्षाही जास्त धावा केल्या होत्या. यंदा असेच यश कोहलीसह सर्व फलंदाजांनी मिळवले तर भारतीय संघ इंग्लंडला त्यांच्याच भूमीत पराभूत करण्याची किमया करणार का हेच पाहणे लक्षवेधी ठरणार आहे.

येत्या बुधवारपासून येथील ट्रेंट ब्रिज मैदानावर पहिल्या कसोटी सामन्याने या मालिकेचा प्रारंभ होत आहे. आजवर या दोन संघात 126 कसोटी सामने झाले असून, इंग्लंडने 48 तर भारताने 29 सामने जिंकले आहेत. 49 सामने अनिर्णित राहिले आहेत.

आयसीसीच्या जागतिक कसोटी अजिंक्‍यपद स्पर्धेच्या यंदाच्या मोसमाचा प्रारंभही याच मालिकेने होत आहे. या मालिकेत विजय मिळवत दोन्ही संघांना 60 गुणांची कमाई करण्याची संधी आहे. प्रत्येक सामना जिंकल्यावर विजेत्या संघाला 12 गुण मिळणार आहेत.
सामना बरोबरीत सुटला तर दोन्ही संघांना प्रत्येकी 6 गुण मिळतील.

सामना अनिर्णित राहिल्यास दोन्ही संघांना प्रत्येकी 4 गुण दिले जातील. कसोटी मालिका सुरू होण्यापूर्वी भारत आणि इंग्लंड या संघांनी खेळाडूंची यादी प्रसिद्ध केली होती. मात्र, त्यानंतर श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत इंग्लंडच्या तर श्रीलंकेच्याच विरुद्धच्या मालिकेत भारतीय संघाला खेळाडूंना झालेल्या करोनाच्या बाधेने ग्रासले होते. तसेच विम्बल्डन व युरो करंडक फुटबॉल स्पर्धेचे सामने पाहण्यासाठी गेलेल्या काही खेळाडूंनाही करोनाची बाधा झाली होती. त्यामुळे या मालिकेसाठी दोन्ही संघांत अनेक बदल करण्यात आले आहेत.

शुभमन गिल, अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदर आणि राखीव गोलंदाज आवेश खान दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर गेले आहेत. त्यांच्या जागी सूर्यकुमार यादव आणि पृथ्वी शॉ यांना संघात सहभागी करण्यात आले आहे. इंग्लंड संघातही एक बदल झाला असून, अष्टपैलू बेन स्टोक्‍सने क्रिकेटमधून विश्रांती घेतली असल्यामुळे त्याच्या जागी क्रेग ओव्हरटनला संघात स्थान देण्यात आले आहे.

बॅटिंग पॅड बांधून बुमराहचा सराव

इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेला येत्या बुधवारपासून सुरुवात होत आहे. या मालिकेसाठी सराव सत्रात कसून सराव करण्यासाठी खेळाडू मेहनत घेत आहेत. त्यातच आपला वेग वाऱ्याच्या विरुद्ध दिशेनेही गोलंदाजी करताना कायम राहावा यासाठी भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याने नव्या पद्धतीचा अनोखा सराव करण्यास सुरुवात केली आहे. त्याने आपल्या पायांना चक्क फलंदाज वापरतात ते पॅड लावून नेटमध्ये गोलंदाजी केली आहे. यामुळे प्रत्यक्ष सामन्यात धावण्याचा व चेंडू रिलीज करण्याचा वेग विरुद्ध दिशेने असलेल्या वाऱ्यातही कायम राहील, असे त्याने म्हटले आहे. पॅड बांधल्यानंतर वाऱ्याच्या विरूद्ध दिशेने गोलंदाजी करणे सरावात सोपे जाते व त्याचा लाभ प्रत्यक्ष सामन्यातही होतो.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.