न्यूझीलंडविरुद्ध आज रंगणार दुसरा टी-20 सामना
ऑकलं : यंदाच्या वर्षातील पहिल्याच विदेशी दौऱ्यात भारताने न्यूझीलंडविरुद्व शुक्रवारी टी-20 मालिकेची विजयाने सुरुवात केली. या पाच सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतल्यानंतर विराटसेना उद्या, प्रजासत्ताकदिनी दुसरा सामना जिंकत विजयी झेंडा फडकविण्यासाठी उत्सुक आहे. दुसरीकडे न्यूझीलंडही विजयी घोडदौड रोखण्यासाठी मैदानात उतरेल.
भारत आणि न्यूझीलंडमधील दुसरा टी-20 सामना ऑकलंड येथेच होणार आहे. या सामन्यासाठी भारतीय संघाकडून जोरदार तयारी करण्यात आली असून संघ विजयाच्या उद्देशानेच मैदानात उतरणार आहे. या सामन्यासाठी भारतीय संघात एक बदल होण्याची शक्यता आहे. शार्दुल ठाकूरच्या जागी वेगवान गोलंदाज नवदीप सैनीला संधी मिळण्याची शक्यता आहे.
भारतीय संघाची सलामी पुन्हा एकदा रोहित शर्मा आणि केएल राहुल ही जोडी करेल. या दोन्ही फलंदाजांनी शेवटच्या सामन्यात संघाला चांगली सुरुवात करून दिली होती. तसेच राहुलने यष्टीरक्षक म्हणूनही योग्य जबाबदारी पार पडली होती. संघाच्या मधल्या फळीत कर्णधार विराट कोहलीसोबत श्रेयस अय्यर आणि मनीष पांडे पुन्हा एकदा दिसतील.
कोहली बाद झाल्यानंतर अय्यर आणि मनीष पांडे यांनी संघाला विजय मिळवून दिला होता. रवींद्र जडेजा आणि शिवम दुबे हे अष्टपैलूची भूमिका पार पाडतील. या दोघांची गोलंदाजी आणि फलंदाजी संघासाठी उपयुक्त ठरते. तर कोहली पुन्हा एकदा फिरकी गोलंदाजीची धुरा युजवेंद्र चहलवर सोपवेल. वेगवान गोलंदाजीत एक बदल पाहावयास मिळू शकतो. पहिल्या टी-20 सामन्यात खेळणाऱ्या शार्दुल ठाकूरच्या जागी नवदीप सैनीला संघात स्थान मिळू शकते. त्याच्या जोडीला जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी असतील.
संभाव्य संघ
भारत ः विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, केएल राहुल, मनीष पांडे, ऋषभ पंत, संजू सॅमसन, श्रेयस अय्यर, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, शार्दुल ठाकूर, नवदीप सैनी, वॉशिंग्टन सुंदर. न्यूझीलंड ः केन विल्यमसन (कर्णधार), मार्टिन गुप्टिल, रॉस टेलर, स्कॉट कुगलेइझन, कॉलिन मुनरो, कॉलिन डी ग्रॅडहॉमे, टॉम ब्रूस, डॅरेल मिशेल, मिशेल सॅंटनर, टीम सेफर्ट, हमीश बेनेट, इश सोधी, टीम साउथी, ब्लेअर टिकर