Meloni-Modi Deal: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इटली दौऱ्यादरम्यान भारत आणि इटली यांच्यातील द्विपक्षीय संबंधांना नवे बळ मिळाले असून दोन्ही देशांनी संबंधांना ‘स्पेशल स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप’च्या स्तरावर नेण्याची घोषणा केली. तब्बल २६ वर्षांनंतर एखाद्या भारतीय पंतप्रधानांचा हा पहिला द्विपक्षीय इटली दौरा ठरला आहे. रोम येथे झालेल्या शिखर परिषदेत इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी पंतप्रधान मोदी यांचे स्वागत करताना भारत-इटली मैत्रीला नवी ऊर्जा मिळाल्याचे सांगितले. दोन्ही देशांमधील व्यापार, संरक्षण, तंत्रज्ञान, नवोन्मेष आणि सांस्कृतिक सहकार्य अधिक दृढ करण्यावर यावेळी भर देण्यात आला. २० अब्ज युरो व्यापाराचे लक्ष्य – द्विपक्षीय चर्चेनंतर झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत मेलोनी यांनी २०२९ पर्यंत भारत-इटली व्यापार १४ अब्ज युरोंवरून २० अब्ज युरोंपर्यंत नेण्याचे महत्त्वाकांक्षी लक्ष्य जाहीर केले. भारत-युरोपियन संघ मुक्त व्यापार करारामुळे हे उद्दिष्ट साध्य होण्यास मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सध्या भारतात ४०० हून अधिक इटालियन कंपन्या कार्यरत असून ‘इनोवेट इंडिया इनिशिएटिव्ह’अंतर्गत नवी दिल्लीत विशेष केंद्र उभारण्यात येणार आहे. या माध्यमातून स्टार्टअप्स, विद्यापीठे, संशोधन संस्था आणि उद्योग क्षेत्रातील सहकार्य वाढविण्यात येणार आहे. हेही वाचा – पंतप्रधान मोदींनी दिली ‘मेलोडी’ची भेट; पण भलत्याच ‘पार्ले’चे शेअर्स सुसाट, वाचा काय आहे नेमका प्रकार! ‘डिझाईन इन इंडिया अँड इटली, डिलिव्हर फॉर द वर्ल्ड’ – पंतप्रधान मोदी यांनी भारत-इटली सहकार्याचा नवा मंत्र मांडताना सांगितले की, इटली आपल्या उत्कृष्ट डिझाईन आणि अचूकतेसाठी जगभर ओळखला जातो, तर भारत मोठ्या प्रमाणातील उत्पादन, प्रतिभा आणि किफायतशीर नवोन्मेषासाठी प्रसिद्ध आहे. त्यामुळे आता “डिझाईन अँड डेव्हलप इन इंडिया अँड इटली, अँड डिलिव्हर फॉर द वर्ल्ड” या तत्त्वावर दोन्ही देश पुढे जातील. याचबरोबर ‘भारत-इटली संयुक्त रणनीतिक कृती आराखडा २०२५-२०२९’चीही घोषणा करण्यात आली. संरक्षण, सुरक्षा आणि हिंद-प्रशांत सहकार्य – पंतप्रधान मोदी यांनी संरक्षण आणि सुरक्षा क्षेत्रातील वाढत्या सहकार्याला परस्पर विश्वासाचे प्रतीक म्हटले. दोन्ही देशांच्या संरक्षण उद्योगांमध्ये सहकार्य वाढत असून को-डेव्हलपमेंट आणि को-प्रॉडक्शनसाठी नवा मार्ग खुला झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. समुद्री शक्ती म्हणून भारत आणि इटली यांच्यात शिपिंग, बंदरे आधुनिकीकरण, लॉजिस्टिक्स आणि कनेक्टिव्हिटी क्षेत्रात सहकार्य वाढविण्यावरही भर देण्यात आला. मेलोनी यांनी हिंद-प्रशांत क्षेत्रातील मुक्त जलवाहतुकीचे महत्त्व अधोरेखित करत जागतिक सुरक्षेसाठी भारतासोबत सहकार्य वाढविण्याची भूमिका मांडली. दहशतवादाविरोधात संयुक्त भूमिका – दोन्ही नेत्यांनी दहशतवाद हा मानवतेसमोरील गंभीर धोका असल्याचे सांगत टेरर फायनान्सिंगविरोधातील संयुक्त प्रयत्नांना महत्त्व दिले. जबाबदार लोकशाही व्यवस्था केवळ दहशतवादाचा निषेध करत नाहीत, तर त्याच्या आर्थिक जाळ्यांवरही कठोर कारवाई करतात, असे मोदी यांनी स्पष्ट केले. सांस्कृतिक नातेसंबंधांनाही चालना – भारत आणि इटली यांच्यातील ‘पीपल-टू-पीपल कनेक्ट’ अधिक मजबूत होत असल्याचे सांगताना मोदी यांनी संस्कृत आणि लॅटिन या भाषांचे समान भाषिक वारसाही अधोरेखित केला. पुढील वर्षी दोन्ही देशांतील राजनैतिक संबंधांच्या ८० व्या वर्षानिमित्त ‘इयर ऑफ कल्चर’ साजरा करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.