मुंबई- भारतीय नागरिक महिन्याला 17 जीबीचा मोबाईल डाटा वापरतात. भारतात मोबाइल ब्रॉडबॅंड डेटाच्या वापरामध्ये गेल्या पाच वर्षांत 53 टक्के वाढ झाली आहे. यामुळे आता भारत हा जगातील सर्वाधिक डेटा वापरणारा देश बनला आहे.
नोकियाच्या वार्षिक मोबाइल ब्रॉडबॅंड इंडेक्स 2022 अहवालानुसार गेल्या पाच वर्षांत भारतात मोबाईल ब्रॉडबॅंड वापरणाऱ्या ग्राहकांची संख्या ही 345 दशलक्षाहून 765 दशलक्ष झाली आहे. 2021 मध्ये भारतामधील सगळी मोबाईल डेटाची ट्रॅफिक ही भारतात फोरजी नेटवर्कद्वारे करण्यात आली होती. शिवाय 2021 मध्ये सुमारे 40 दशलक्ष वापरकर्त्यांनी फोर जी सेवा वापरण्यास सुरुवात केली आहे.
2021 यावर्षी 160 दशलक्ष स्मार्टफोनची आयात भारतात करण्यात आली. यामध्ये 30 दशलक्ष स्मार्टफोन हे फाईव्ह जी सक्षम स्मार्टफोन होते. सद्यस्थितीला भारतात वापरण्यात येणारे 80 टक्के स्मार्टफोन फोरजी सक्षम आहेत. तर फाईव्ह जी सक्षम ऍक्टिव्ह स्मार्टफोनची संख्या ही देशात 10 दशलक्ष आहे.
भारतातील तरुण दिवसाचे 8 तास ऑनलाईन घालवतात. तर फाईव्ह जी सेवांचा महसूल हा पुढील पाच वर्षांत 164 टक्क्यानी वाढण्याची शक्यता आहे. नोकियाचे उपाध्यक्ष संजय मलिक म्हणाले की भारतातील मोबाईल ब्रॉडबॅंड इकोसिस्टम विकसित करण्यात फोर जी सेवेने महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
आता, आगामी फाईव्ह जी स्पेक्ट्रम लिलाव आणि या वर्षाच्या अखेरीस होणारे फाईव्ह जी सेवांचे व्यावसायिक लॉन्चिंग भारताला खूप उपयुक्त ठरले. आम्ही भारतीय दूरसंचार कंपन्यांना फाईव्ह जी नेटवर्क स्थापन करण्यात तसेच नागरिक व उद्योगांना जागतिक दर्जाचे नेटवर्क प्रदान करण्यासाठी उत्सुक आहोत.