अग्रलेख : आउटसोर्सिंग हबच्या दिशेने

सध्याच्या काळात भारत ग्लोबल आउटसोर्सिंगचे हब म्हणून नावारूपास येत आहे. आउटसोर्सिंगमधील भारताचा वाढता पसारा पाहता केंद्र सरकारने बिझनेस प्रोसेस आउटसोर्सिंग (बीपीओ)च्या उद्योगांना प्रोत्साहित करण्यासाठी महत्त्वाचे निर्णय घेतले. “व्हॉइस’ बेस्ड बीपीओ म्हणजेच टेलिफोनच्या माध्यमातून ग्राहकांना सेवा देण्याच्या क्षेत्राचा आणखी विकास व्हावा यासाठी बीपीओसाठीच्या नियमावलीत सरलता, उदारपणा आणि स्पष्टता आणली आहे. 

केंद्र सरकारच्या नव्या नियमावलीतून घरगुती आणि आंतरराष्ट्रीय बीपीओ कंपन्यांदरम्यान असलेला फरक संपवला आहे. तसेच अन्य सेवा संस्थांमध्ये (ओएसपी) इंटरकनेक्‍टिव्हीटीला परवानगी देण्याबरोबरच अनेक सवलती प्रदान केल्या आहेत. ओएसपी म्हणजे दूरसंचार साधनांच्या मदतीने काम करणाऱ्या आयटी सेवा, कॉल सेंटर आदी आउटसोर्सिंग सेवा देणाऱ्या कंपन्या होत. यात टेलिमार्केटिंग, टेलिमेडिसीन आदी सेवांचा समावेश आहे. नव्या मार्गदर्शक सूचनांनुसार बीपीओसारख्या विकसित आउटसोर्सिस क्षेत्रात सुलभता येऊ शकते. यामुळे देशातील टेक्‍नॉलॉजी इंडस्ट्रीला मदत मिळू शकते. 

आउटसोर्सिंगचा ढोबळ अर्थ म्हणजे कोणतेही काम कंपनी क्षेत्राच्या बाहेर देशातच नाही परदेशातही गरजेनुसार उपलब्ध करून देणे. अशा प्रकारचा ट्रेंड हा आयटीच्या वाढत्या प्रभावामुळे वाढला आहे. अमेरिका, ब्रिटन, कॅनडासह अनेक देशांनी आयटी, फायनान्स, मेडिकल ट्रान्सक्रिप्शन, विमा, बॅंकिंग, शिक्षण आदी क्षेत्रांत आउटसोर्सिंग केले आणि यात त्यांना मोठा फायदा झाला. गुणवत्तापूर्ण काम करणाऱ्या देशातील आउटसोर्सिंग कंपन्यांची भारतातच नाही तर भारताबाहेरही मदत घेतली जात आहे. अर्थात, पश्‍चिम आणि युरोपीय देशातील सेवा ही भारताच्या तुलनेत सुमारे पाच ते दहा टक्के अधिक महाग आहे. याप्रमाणे भारतातील आउटसोर्सिंग सेवा स्वस्त आणि दर्जेदार मानली जाते. 

एका अहवालात म्हटले की, कोविडमुळे अमेरिकेसह अन्य विकसित देश अर्थव्यवस्थेचा गाडा रुळावर आणताना लहान-मोठे उद्योग हे उत्पादन खर्च कमी करण्यावर भर देत आहेत. यामुळे आउटसोर्सिंगला चालना मिळत आहे. आउटसोर्सिंगच्या क्षेत्रात भारताची प्रगती होण्यामागे देशांतर्गत सक्षम दळणवळण यंत्रणा कारणीभूत आहे. अलीकडच्या काळात दूर संचार देश-विदेशातील अनेक कंपन्यांनी शिरकाव केल्याने दूरसंचारच्या दरात मोठी घसरण झाली आहे. आउटसोर्सिंगचा व्यवसाय वाढण्यास उच्च कोटींची तत्काळ सेवा, आयटी तज्ज्ञ, इंग्रजीतील निष्णात युवकांची मोठी फळी यामागचे प्रमुख कारणे आहेत. या बळावर भारत संपूर्ण जगात आउटसोर्सिंग क्षेत्रात अग्रेसर राहिला आहे. 

भारतात बीपीओ उद्योग हा जागतिक ग्राहकांसाठी नावीन्यपूर्ण ठरत आहे. कोविडच्या काळात वर्क फ्रॉम होम आणि आयटी कंपन्यांकडून कार्बन उत्सर्जन कमी होणे हे भारतासाठी फायद्याचे ठरत आहे. अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी नवीन आर्थिक धोरण जाहीर करताना भारताचा आउटसोर्सिंग उद्योग वेगाने वाढण्याची शक्‍यता वर्तविली आहे. आजघडीला भारत जगाला मोठ्या प्रमाणात आउटसोसिंग सेवा देत आहे. 

भारतातील 200 हून अधिक आयटी कंपन्या 80 हून अधिक देशात काम करत आहेत. माजी दळणवळणमंत्री रविशंकर प्रसाद यांच्या मते, भारतात बीपीओ क्षेत्रात सुमारे 14 लाखांहून अधिक लोकांना रोजगार मिळाला आहे. भारतीय बीपीओ उद्योगाचा आकार हा कोविडमुळे वेगाने वाढत तो 2025 पर्यंत 55.5 अब्ज डॉलर (सुमारे 3.9 लाख कोटी रुपये) च्या पातळीवर पोचू शकतो.आउटसोर्सिंगची संधी प्रत्यक्षात आणण्यासाठी आणखी काही गोष्टींवर आपल्याला लक्ष द्यावे लागेल. आउटसोर्सिंग उद्योगासाठी कृषी, आरोग्य, वेलनेस, टेलिमेडिसीन, शिक्षण आणि कौशल्य विकास क्षेत्राशी संबंधित नवीन टेक्‍निकल सोल्यूशन्सची निर्मिती करण्याची गरज आहे. आउटसोर्सिंग उद्योगांना महानगराच्या सीमेबाहेर लहान शहर आणि ग्रामीण भागापर्यंत नेण्याची आवश्‍यकता आहे. भारताच्या स्टार्टअप संस्थापकांना आउटसोर्सिंगशी संबंधित जागतिक दर्जाचे उत्पादन तयार करण्यावर लक्ष द्यावे लागेल. यानुसार आउटसोर्सिंग क्षेत्रात भारताला जागतिक स्पर्धेत स्थान निर्माण करता येईल.

आउटसोर्सिंग क्षेत्रात जगभरातून मिळणाऱ्या आव्हानांकडे लक्ष द्यावे लागणार आहे. चीनदेखील या क्षेत्रात नियोजनबद्धरित्या वाटचाल करत आहे. आपल्यालाही भविष्यात आणखी कौशल्य विकसित करण्यासाठी लक्ष द्यावे लागणार आहे. सॉफ्टवेअर उद्योगात आपले नेतृत्व असण्यामागे वाजवी दरात असलेली सेवा आणि प्रोग्रॅम कारणीभूत असून या गोष्टींची आपल्याला जाण आहे. या स्थितीला कायम राहण्यासाठी या क्षेत्रातील लोकांना आणखी तांत्रिकदृष्ट्या सक्षम करावे लागेल. संशोधन, नाविन्यपूर्णता आणि जागतिक स्पर्धा या निकषावर आपल्याला पुढे जावे लागेल. आर्टिफिशियल इंटिलिजन्स, व्हर्च्युअल रियालिटी, रोबोटिक प्रोसेस, ऑटोमेशन, इंटरनेट ऑफ थिंग्ज, बिग डेटा ऍनालिसिस, क्‍लाउड कम्प्युटिंग आणि ब्लॉकचेन यासारख्या क्षेत्रात मोठ्या संख्येने युवक कुशल झाले आहेत.

आउटसोर्सिंगच्या विकासासाठी केल्या जाणाऱ्या प्रयत्नातूनच भारताचे आयटी सेक्‍टर आणखी बूम होणार आहे. आगामी काळात अर्थव्यवस्थेतील मोठी शक्ती म्हणून त्याकडे पाहिले जाईल. आपल्याला आउटसोर्सिंगसाठी अमेरिकी बाजाराबरोबरच युरोप, आशिया प्रशांत क्षेत्राच्या विविध देशात असणाऱ्या संधींचे आकलन करावे लागणार आहे. आउटसोर्सिंग क्षेत्रात पुढे जाण्यासाठी विमानतळ, रस्ते, वीज यासारख्या पायाभूत क्षेत्रात आणखी वेगाने विकास करावा लागणार आहे. आउटसोर्सिंगमधील दमदार वाटचाल पाहता बीपीओशी संबंधित सरकारच्या नव्या दिशा निर्देशांचे पालन केल्यास आपला देश ग्लोबल आउटसोर्सिंग हब म्हणून नक्कीच उदयास येईल.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.