भारताची विजयाकडे वाटचाल

वेस्ट इंडिजला विजयासाठी 423 धावांची गरज
किंगस्टन: भारतीय संघ दुसऱ्या कसोटीतही विजयाच्या दिशेने वाटचाल करताना दिसत आहे. भारताने दुसऱ्या डावांत 4 विकेटच्या बदल्यात 168 धावांवर डाव घोषित करत पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर विंडीजला 468 धावांचे आव्हान दिले आहे.

यावेळी पहिल्या डावात वेस्ट इंडिजला केवळ 117 धावांवर बाद करुनही भारताने पुन्हा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दुसऱ्या डावातली भारताचे सलामीवीर फारशी चांगली कामगिरी करु शकले नाहीत. सलामीवीर मयंक अग्रवाल 4 धावा करुन परतल्याने 9 धावांवरच भारताला पहिला धक्‍का बसला. यानंतर आलेल्या चेतेश्‍वर पुजाराच्या साथीत लोकेश राहुलने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. यावेळी या दोघांनीही अतिसंथ फलंदाजी करत एकेरी धावांवरच आपला भर ठेवली. त्यामुळे विंडीजच्या गोलंदाजांना बळी मिळवण्यात भरपुर अडचणींचा सामना करावा लागला. मात्र, 63 चेंडूत 6 धावा करुन राहुल परतल्यानंतर आलेला कर्णधार विराट कोहलीही पहिल्याच चेंडूवर परतल्याने भारताची 3 बाद 36 अशी अवस्था झाली. यानंतर चेतेश्वर पुजाराने थोडीशी झुंज देण्याचा प्रयत्न केला, मात्र तो ही जेसन होल्डरच्या गोलंदाजीवर माघारी परतला.

पुजाराने 66 चेंडूत 3 चौकारांच्या मदतीने 27 धावांची महत्वपूर्ण खेळी केली. यानंतर उप-कर्णधार अजिंक्‍य रहाणे आणि हनुमा विहारीने सामन्याची सुत्र आपल्या हाती घेत भारताचा डाव सावरण्यावर भर दिला. यावेळी दोघांनीही अर्धशतकी खेळी साकारत भारताला 150 धावांचा टप्पा ओलांडून दिला. अजिंक्‍य रहाणेने नाबाद 64 तर हनुमा विहारीने 53 धावांची खेळी केरत भारताला 4 बाद 168 धावांची मजल मारुन दिली. त्यामुळे विंडीजसमोर विजयासाठी 468 धावांचे अवघड आव्हान ठेवले. यावेळी, विंडीजकडून केमार रोचने तीन तर कर्णधार जेसन होल्डरने एक गडी बाद केला. तत्पूर्वी, तिसऱ्या दिवसाची वेस्ट इंडिजची सुरुवात 7 गडी बाद 87 धावांनी झाली. भारताने वेस्ट इंडिजच्या तीन विकेट्‌स काढल्या. बुमराहने 6 गडी बाद करत सर्वोत्तम कामगिरी बजावली.

यावेळी दुसऱ्या डावात प्रत्युत्तरादाखल मैदानात उतरलेल्या विंडीजच्या क्रेग ब्रेथवेटला इशांत शर्माने यष्टीरक्षक पंतकडे झेल द्यायला भाग पाडले. यानंतर कॅम्पबेल आणि ब्राव्हो यांची छोटेखानी भागीदारी रंगली. यानंतर विराट कोहलीने तात्काळ मोहम्मद शमीला गोलंदाजी देत, विंडीजला धक्का दिला. शमीने कॅम्पबेलला कर्णधार विराट कोहलीच्या हाती झेल द्यायला भाग पाडत विंडीजला दुसरा धक्का दिला. अखेरीस तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा विंडीजने 45 धावांपर्यंत मजल मारली होती. हा सामना जिंकण्यासाठी विंडीजला अजुनही 423 धावांची आवश्‍यकता आहे.

इशांतने मोडला कपील देव यांचा विक्रम
दुसऱ्या डावात फलंदाजीस आलेल्या वेस्ट इंडिजच्या क्रेग ब्रेथवेटला यष्टीरक्षक पंतकडे झेल द्यायला भाग पाडत त्यांना पहिला धक्का दिला. या बळीसह इशांत शर्मा, कसोटी क्रिकेटमध्ये आशिया खंडाबाहेर सर्वाधिक बळी घेणारा दुसरा भारतीय गोलंदाज ठरला आहे. इशांतने माजी कर्णधार कपिल देव आणि जलदगती गोलंदाज झहीर खान यांचा विक्रम मोडीत काढला. सध्या या यादीमध्ये भारताचा माजी कर्णधार आणि फिरकीपटू अनिल कुंबळे 200 बळींसह पहिल्या स्थानावर आहे.

मोहम्मद शमीची ऐतहासिक कामगिरी
मोहम्मद शमीने दुसऱ्या सामन्यात कसोटी क्रिकेटमध्ये बळींचं दीड शतक साजरे केले. शमीने आपल्या 42 व्या कसोटी सामन्यात ही कामगिरी करुन दाखवली आहे. सर्वात कमी कसोटी सामन्यांमध्ये बळींचं दीड शतक साजरं करणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत शमी आता तिसऱ्या स्थानावर आहे. शमीने झहीर खान आणि इशांत शर्मा यांना मागे टाकलं आहे. या यादीमध्ये कपिल देव आणि जवागल श्रीनाथ हे अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या स्थानावर आहेत.

संक्षिप्त धावफलक

भारत पहिला डाव सर्वबाद 416, दुसरा डाव 4 बाद 164 (अजिंक्‍य रहाणे नाबाद 64, हनुमा विहारी नाबाद 53, केमार रोच 3-28, जेसन होल्डर 1-20), वेस्ट इंडिज पहिला डाव सर्वबाद 117, दुसरा डाव 2 बाद 45 (डॅरेन ब्राव्हो नाबाद 18, जॉन कॅम्पबेल नाबाद 16, मोहम्मद शमी 1-12, इशांत शर्मा 1-13).

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)