भारत करोनाबाधित संख्येच्या जागतिक क्रमवारीत टॉप टेनमध्ये

आता कॅनडानेही चीनला टाकले मागे

पॅरिस -सर्वांधिक करोनाबाधित आढळलेल्या देशांच्या जागतिक क्रमवारीत भारत टॉप टेनमध्ये पोहचला आहे. मागील काही दिवसांत करोनाबाधितांमध्ये लक्षणीय भर पडत असल्याने भारत त्या संख्येत जगात दहाव्या स्थानी पोहचला आहे.

जगभरात 55 लाखांहून अधिक करोनाबाधितांची नोंद झाली आहे. करोना संसर्गाने जगभरात घेतलेल्या बळींची संख्या साडेतीन लाखांजवळ जाऊन पोहचली आहे. करोना फैलावामुळे निर्माण झालेल्या जागतिक साथीचा सर्वांधिक फटका अमेरिकेला बसला आहे. त्या देशात सर्वांधिक सुमारे 17 लाख करोनाबाधित आहेत. त्याशिवाय, अमेरिकेत करोनाने घेतलेल्या बळींची संख्या 99 हजार 300 वर गेली आहे.

करोनाबाधित संख्येच्या जागतिक क्रमवारीत ब्राझील आणि रशिया हे देश अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानी आहेत. त्या देशांमधील करोनाबाधितांच्या संख्येने याआधीच 3 लाख 50 हजारांचा टप्पा ओलांडला आहे. जागतिक क्रमवारीतील इतर टॉप टेन देशांमध्ये स्पेन, ब्रिटन, इटली, फ्रान्स, जर्मनी आणि तुर्कीचा समावेश आहे. इराणला मागे टाकून आता भारत दहाव्या स्थानी पोहचला आहे. अकराव्या स्थानी गेलेल्या इराणमध्ये 1 लाख 37 हजारांहून अधिक करोनाबाधित आहेत.

करोनाचा सर्वप्रथम उद्रेक झालेल्या चीनला पेरूपाठोपाठ कॅनडानेही मागे टाकले आहे. पेरूमध्ये सुमारे 1 लाख 20 हजार तर कॅनडात 84 हजारांहून अधिक करोनाबाधित आढळले आहेत. ते देश जागतिक क्रमवारीत अनुक्रमे 12 व्या आणि 13 व्या स्थानी आहेत. तर सुमारे 83 हजार बाधितांची नोंद झालेला चीन 14 व्या स्थानी ढकलला गेला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.