गुरजित कौरचे चार गोल; महिलांच्या हॉकीत भारत उपांत्य फेरीत

हिरोशिमा – गुरजित कौर हिने हॅट्ट्रिकसह चार गोल केले, त्यामुळेच भारताने फिजी संघाचा 11-0 असा धुव्वा उडविला आणि महिलांच्या आंतरराष्ट्रीय हॉकी स्पर्धेत उपांत्य फेरीकडे वाटचाल केली.

साखळी गटातील एकतर्फी सामन्यात गुरजित हिने 15 व्या, 19 व्या, 21 व्या व 22 व्या मिनिटाला गोल केले. मोनिका हिने दोन गोल करीत तिला योग्य साथ दिली. लालरेम सियामी, कर्णधार राणी, वंदना कटारिया, लिलिमा मिंझ व नवनीत कौर यांनी प्रत्येकी एक गोल केला व संघाच्या विजयास हातभार लावला.

जागतिक क्रमवारीत भारतास नववे स्थान आहे. त्यांनी अपेक्षेप्रमाणे या लढतीत प्रारंभापासूनच वर्चस्व गाजविले. संपूर्ण सामन्यात केवळ एकदाच फिजी संघास भारतावर चाल करता आली. सामन्याच्या चौथ्या मिनिटाला भारताच्या सियामी हिला गोल करण्याची सुवर्णसंधी मिळाली. त्याचा फायदा घेत तिने अचूक फटका मारला व संघाचे खाते उघडले.

10 व्या मिनिटाला भारतास पेनल्टी कॉर्नर मिळाला. त्याचा लाभ घेत कर्णधार राणी हिने गोल करीत संघाला 2-0 अशी आघाडी मिळवून दिली. पुढच्या मिनिटाला मोनिका हिने नेहा गोयल हिच्या पासवर भारताचा तिसरा गोल केला. 12 व्या मिनिटाला वंदना हिने प्रतिस्पर्धी संघाच्या तीन खेळाडूंना चकविले आणि सुरेख गोल केला. पाठोपाठ भारताला पेनल्टी कॉर्नरची संधी मिळाली. त्याचा लाभ घेत गुरजित हिने स्वत:चा पहिला गोल नोंदविला. त्यानंतर तिने आणखी तीन गोल केले. त्यामुळे भारतास 8-0 अशी भक्कम आघाडी मिळाली.

मोनिका हिने 33 व्या मिनिटाला सुशीला चानू हिने दिलेल्या पासवर संघाचा नववा गोल केला. 51 व्या मिनिटाला लिलिमा हिने रिव्हर्स फ्लिकचा उपयोग करीत अप्रतिम गोल केला. त्यानंतर सहा मिनिटांनी नवनीत हिने संघास 11-0 असे अधिक्‍क्‍य मिळवून दिले.

Leave A Reply

Your email address will not be published.