तिसरी टी-20 लढत आज
हॅमिल्टन : भरात असलेल्या भारतीय संघाचा आज न्यूझीलंडशी तिसरा टी-20 सामना होत आहे. पाच सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी भक्कम आघाडी घेतलेल्या भारताला आजच्या सामन्यासह मालिका जिंकण्याची संधी आहे. या सामन्यातही नाणेफेक आणि वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह या दोन गोष्टी पुन्हा एकदा निर्णायक ठरणार आहेत.
पहिल्या आणि दुसऱ्या सामन्यात याच गोष्टी यजमानांच्या पारड्यात पडल्या नाहीत व त्यांना पराभवांचा सामना करावा लागला. फिरकी गोलंदाज रवींद्र जडेजा आणि बुमराह यांच्या गोलंदाजीसमोर न्यूझीलंडची फलंदाजी साफ अपयशी ठरली होती. याही सामन्यात फार वेगळे चित्र दिसण्याची शक्यता सध्यातरी दिसणार नाही. कर्णधार केन विल्यमसनसह यजमानांचे प्रमुख फलंदाज संघाला मोठी धावसंख्या उभारून देऊ शकलेले नाहीत.
तर दुसरीकडे भारतीय फलंदाजांनी विशेषतः लोकेश राहुल व श्रेयस अय्यर यांनी सातत्यपूर्ण खेळ करत संघाच्या विजयात मोलाची भूमिका निभावलेली आहे.
न्यूझीलंडमध्ये टी-20 मालिका जिंकण्याची भारतीय संघाला प्रथमच संधी मिळणार आहे. यापूर्वी महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली 2008-09 व 2019 साली अनुक्रमे 2-0 व 2-1 अशी मालिका गमवावी लागली होती.
त्याचा वचपा काढण्याची यंदा विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला मिळाली आहे. गतवर्षीपासून भारताने खेळलेल्या पाचही टी-20 लढती जिंकलेल्या आहेत. दक्षिण आफ्रिकेविरुद्धची मालिका 1-1 अशी बरोबरीत सुटली होती. या मालिकेतील तिसरा सामना पावसामुळे होऊ शकला नव्हता.
प्रतिस्पर्धी संघांसाठी भारतीय संघ कर्दनकाळ
जागतिक क्रिकेटवर अधिपत्य सिद्ध करताना कर्णधार विराट कोहलीचा भारतीय क्रिकेट संघ आता प्रतिस्पर्धी संघासाठी कर्दनकाळ बनत चालला आहे. समोर कोणताही संघ असो भारतीय संघ त्यांना निर्दयीपणे चिरडून टाकत आहे.
अर्थात, त्यात त्यांची मेहनतच निर्णायक ठरत आहे, अशा शब्दांत पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने कोहलीच्या संघाचे कौतुक केले आहे. जागतिक क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियासारखे प्रबळ संघदेखील आपली ओळख विसरून गेले असून आता भारतीय संघाचाच दबदबा प्रस्थापित झाला आहे. एकेकाळी जागतिक क्रिकेटवर ऑस्ट्रेलियाचा दबदबा असताना भारत आणि पाकिस्तान हे दोनच संघ त्यांना आव्हान देत होते, सध्या मात्र सगळ्याच संघांना मागे टाकून भारत एकहाती सत्ता राखत आहे, असेही अख्तरने स्पष्ट केले.
कोहलीची थरारक स्टंटबाजी
तंदुरुस्तीसाठी कोणतीही तडजोड न करणारा भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याचे थरारक स्टंट सध्या सोशल मीडियावर गाजत आहेत. संघ न्यूझीलंड दौऱ्यावर असून तेथील जिममध्ये कोहलीने तंदुरुस्तीसाठी चक्क बॉलीवुडच्या धर्तीवर स्टंटबाजी केली व त्याला काही सेकंदातच लाखो लाईक्स मिळाले. कोहलीने जिममधील व्यायामाचा तसेच पायांच्या तंदुरुस्तीसाठी केलेला एक स्टंट व्हिडीओरूपात शेअर केला. जिममध्ये कोहलीसमोर दोन बॉक्स आहेत, कोहली त्यावर उडी मारून बॅलन्स करताना दिसत आहे. यापूर्वी देखील कोहलीने व्यायामाचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत.