इम्रान यांनी घेतली आयएसआय प्रमुखाबरोबर बैठक
इस्लामाबाद : करोना संकटातही पाकिस्तानला भारतद्वेषानेच पछाडले असल्याचे पुन्हा दिसून आले. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी सोमवारी त्यांच्या देशाची गुप्तचर संस्था असणाऱ्या आयएसआयच्या प्रमुखाबरोबर बैठक घेतली. अनेक भारतविरोधी कारवायांत आयएसआय नेहमी गुंतलेली असते.
विभागातील सुरक्षा स्थिती आणि नियंत्रण रेषेच्या (एलओसी) लगतची स्थिती यांचा आढावा इम्रान आणि आयएसआय प्रमुख फैज हमिद यांच्या बैठकीत घेण्यात आला. करोना संकटाच्या काळातही पाकिस्तानी सैनिक वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन करून भारतीय हद्दीत गोळीबार आणि तोफगोळ्यांचा मारा करत आहेत. मात्र, भारताकडूनच शस्त्रसंधीचा भंग होत असल्याचा कांगावा इम्रान आणि हमिद यांच्या बैठकीत करण्यात आला.
जम्मू-काश्मीरच्या जनतेला भारताकडून मूलभूत आरोग्य सुविधा नाकारल्या जात आहेत, असे नक्राश्रू त्या बैठकीत ढाळण्यात आले. सध्या पाकिस्तानला करोना फैलावाशी झुंजावे लागत आहे. त्या देशातील करोनाबाधितांचा आकडा 8 हजार 500 वर गेला आहे. करोना संकटामुळे उद्भवलेल्या स्थितीच्या हाताळणीवरून पाकिस्तानचे सर्वोच्च न्यायालय सातत्याने त्या देशाच्या सरकारला फटकारत आहे. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करून पाकिस्तानचे उच्चपदस्थ इतर बाबींकडेच ध्यान देत असल्याचे इम्रान यांच्या बैठकीतून पुन्हा स्पष्ट झाले.