सर्पदंशाने मृत्युचे सर्वाधिक प्रमाण भारतातच

  • जागरुकतेचा अभाव आणि मांत्रिकांचा प्रभाव
  • देशात महाराष्ट्र आघाडीवर

नवी दिल्ली – जगात सर्वाधिक विषारी सापांच्या जाती भारतातच आढळतात. मात्र, सर्वसामान्य नागरिकांमध्ये नसलेली जागरुकता, तांत्रिक आणि मांत्रिकांचे प्राबल्य आणि औषधोपचारांची कमतरता यामुळे जगात सर्पदंशाने मृत्युमुकी पडणाऱ्यांची सर्वात मोठी संख्या भारतातच आढळते, असे दिसून आले आहे. जगात प्रतिवर्षी 54 लाख सर्पदंशाच्या घटना घडतात. त्यापैकी जवळपास निम्म्या म्हणजे 28 लाख घटना भारतात घडतात. सर्पदंशाने जगभर प्रतीवर्षी एक लाख लोक प्राणाला मुकतात. त्यापैकी 45,900 म्हणजे जवळपास निम्मे भारतीय नागरिक असतात, असे एका पाहणीत आढळून आले आहे. या निकषांवर “सर्पदंश मृत्युची भारत राजधानी आहे,’ असे म्हणायला वाव आहे.

भारतात महाराष्ट्रच आघाडीवर

अतिरिक्त मुख्य वन जीवसंरक्षक सुनिल लिमये यांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्पदंशाच्या घटनेचे दररोज किमान 2 कॉल्स वन खात्याकडे येतात आणि साधारण सहा महिन्यांत अशा कॉल्सची संख्या 600 ते 700 असते. सर्पदंशाने मरण पावणाऱ्यांच्या संख्येत देशात महाराष्ट्र आघाडीवर असून प्रतिवर्षी साधारणपणे 24,437 सर्पदंशाच्या घटना घडल्याचे दिसून येते. त्यानंतर पश्‍चिम बंगाल, आंध्र प्रदेश, ओरिसा आणि कर्नाटकचा क्रमांक लागतो. यापूर्वी पश्‍चिम महाराष्ट्रातील काही स्वयंसेवी संस्थांनी याविषयी जनजागृती करणारी भित्तीपत्रके शेकडो ग्रामपंचायतींसाठी दिली होती. मात्र, त्याच बरोबरीने सर्पदंशावरील उपचारांची सोय प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात झालेली असणे आवश्‍यक आहे, यावर भर देण्यात आला आहे.

भारतात सापांच्या एकूण 300 जाती असून त्यापैकी 62 प्रजाती विषारी आहेत. एखाद्या ठिकाणी सर्पदंशाची घटना घडल्यानंतर संबंधित रुग्णाला दवाखान्यात अथवा प्राथमिक आरोग्य केंद्रात ने नेता, लोक विष उतरवणाऱ्या तांत्रिकाकडे अथवा मांत्रिकाकडे घेऊन जातात. यामध्ये बहुमूल्य असा वेळ वाया जातो आणि उपचारांअभावी रुग्ण दगावतो. केंद्रिय आरोग्य मंत्रालयाने केलेल्या याबाबतीतल्या सर्वेक्षणाचा अहवाल नुकताच प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्यामध्ये असे दिसून आले आहे की, एप्रिल ते ऑक्‍टोबर या महिन्यांत सर्पदंशाच्या सर्वाधिक घटना घडतात. थंडीच्या दिवसांत साप शक्‍यतो “हायबरनेशन’ (प्रदीर्घ निद्रा)मध्ये जात असल्याने ते बिळातून बाहेर येत नाहीत. त्यामुळे नोव्हेंबर ते मार्च त्या मानाने सर्पदंशाच्या घटना कमी घडतात. सर्वसामान्य नागरिकांमध्ये सर्पदंशाच्या गंभीरतेविषयी अज्ञान असल्याने या क्षेत्रात काम करत असलेल्या स्वयंसेवी संस्थांसमोर हे एक मोठे जनजागृतीचे आव्हान आहे.

 

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)