नवी दिल्ली – वाघांच्या संख्येची अचूक नोंद ठेवण्यासाठी वनक्षेत्रात सर्वात जास्त कॅमेरे बसवल्याबद्दल आपल्या देशाची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली असून, उद्या जागतिक व्याघ्र दिनाच्या निमित्ताने केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर हा पुरस्कार देशाच्या जनतेला अर्पण करणार आहेत.
उद्याच्या कार्यक्रमात देशभरातून अंदाजे 500 जण सहभागी होण्याची शक्यता आहे. उद्याच्या जागतिक व्याघ्र दिनानिमित्त आज सकाळी एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन नवी दिल्ली इथे करण्यात आले होते. त्यामध्ये जावडेकर बोलत होते.
जगातले 70 टक्के वाघ भारतात असून भारतीय वनसंपदेची ही ताकद आहे. वाघांचे संरक्षण करणे एकूण वनअरण्यांच्या पर्यावरणीय संरचनेच्या जतन संवर्धनासाठी आवश्यक आहे. वाघ हा निसर्गाचा एक मौल्यवान आविष्कार आहे आणि जंगलाची स्थिती चांगली असल्याचे त्याच्या उपस्थितीवरून निदर्शनास येते. 1973 मध्ये देशात वाघ फक्त 9 ठिकाणी होते, आता ही संख्या 50 वर गेली आहे.
वाघांव्यतिरिक्त, भारतात 30 हजार हत्ती, 3000 एकशिंगी गेंडा आणि 500 हून अधिक सिंह आहेत. जगातील वाघांची संख्या वाढविण्यासाठी प्रत्येक देशाला सहकार्य करण्यास तयार आहे, असेही जावडेकर म्हणाले.
भौतिक साधनसंपत्तींच्या अडचणी असूनही देशात जगातील जवळपास 8 टक्के टिकून जैववैविध्य टिकून राहिले आहे. वृक्षांची पूजा करण्यासारखी प्रथा हीच निसर्गाशी असलेली भारताची अनोखी सुसंगतता दर्शविते, अशा शब्दांत निसर्गाशी समरस असणाऱ्या भारतातील संस्कृतीवर जावडेकर यांनी प्रकाश टाकला.
“स्मॉल वाईल्ड कॅट्स ऑफ इंडिया’ या पोस्टरचे तसेच राष्ट्रीय व्याघ्र गणना अहवाल 2018 चे प्रकाशन यावेळी जावडेकर यांच्या हस्ते करण्यात आले.