‘भारताने करोना व्हायरसच्या मृतांचे योग्य आकडे दिले नाही’

करोनाबाधितांच्या मृत्यूच्या आकडेवारीवरून ट्रम्प यांचा भारतावर गंभीर आरोप

नवी दिल्ली -अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी करोना व्हायरसमुळे होणाऱ्या मृत्यूबाबत मोठे विधान केले आहे. ट्रम्प यांनी चीन आणि भारतावर मृत्यूचे योग्य आकडे न देण्याचा आरोप केला आहे.

नोव्हेंबर महिन्यात अमेरिकेत राष्ट्रपतीपदासाठी निवडणूक पार पडणार आहे. याच पार्श्वभूमीवर निवडणुकीच्या आधीच्या ‘प्रेसिडेन्शिअल डिबेट’ला सुरूवात झाली आहे. यावेळी डोनाल्ड ट्रम्प बोलत होते.

लाखो लोकांच्या मृत्यूवर आपल्या धोरणांचा बचाव करत ट्रम्प म्हणाले की, जर वेळेवर लॉकडाऊन लावला नसता तर यापेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला असता. जर आपण आपला देश सुरूच ठेवला असता तर दोन लाख नाही तर अधिक लोकांचा जीव गेला असता. जेव्हा तुम्ही आकड्यांची गोष्ट करता त्यावेळी चीनमध्ये किती लोकांचा मृत्यू झाला हे तुम्हाला माहित आहे का? रशिया आणि भारतात किती जणांचा मृत्यू झाला? हे योग्य आकडे देत नाहीत, असा आरोप त्यांनी केला आहे.

तसेच, जेव्हा मी लॉकडाऊन लावला त्यावेळी तुम्ही मला वर्णभेदी म्हटले. तुम्हाला हा चुकीचा निर्णय वाटला होता. परंतु डॉक्टर फाउजी स्वतः म्हणाले की ट्रम्प यांनी लाखो लोकांचे प्राण वाचवले, असेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, अमेरिकेतील करोनाग्रस्तांचा आकडा 71 लाखांच्या पुढे गेला असून, मृतांचा आकडा देखील 2 लाखांवर आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.