ओटावा – कॅनडातल्या समुदायामध्ये आणि लोकशाही प्रक्रियेमध्ये हस्तक्षेप करण्याची भारताची इच्छा आणि क्षमता देखील असल्याचे कॅनडातल्या वरिष्ठ गुप्तचर अधिकारी महिलेने म्हटले आहे. कॅनडातल्या एका प्रसिद्धी माध्यमाने यासंदर्भातले वृत्त प्रसिद्ध केले आहे. व्हेनेसा लॉयड असे या गुप्तचर महिलेचे नाव असून त्या कॅनेडियन सिक्युरिटी इंटेलिजेंस सर्व्हिसच्या उपसंचालक आहेत. चीन, रशिया आणि पाकिस्तान देखील कॅनडातील राष्ट्रीय निवडणूक प्रचारात हस्तक्षेप करू शकतात, असा असा दावा देखील त्यांनी केला आहे.
कॅनडामध्ये २८ एप्रिल रोजी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीच्या अखंडतेचे रक्षण करण्याच्या प्रयत्नांबाबत सोमवारी झालेल्या पत्रकार परिषदेत लॉयड बोलत होत्या.
आम्ही हे देखील पाहिले आहे की भारत सरकारकडे आपला भू-राजकीय प्रभाव प्रस्थापित करण्यासाठी कॅनेडियन समुदायांमध्ये आणि लोकशाही प्रक्रियांमध्ये हस्तक्षेप करण्याचा हेतू आणि क्षमता आहे, असे लॉयड म्हणाल्या.
कॅनडात २०१९ मध्ये सादर केलेल्या संघीय प्रोटोकॉल अंतर्गत कॅनडाच्या मुक्त आणि निष्पक्ष मतदानाला धोक्यात आणले जात असल्यास जनतेला इशारा देण्याचा अधिकार नोकरशहांच्या पॅनेलला आहे. लॉयड यांच्या अध्यक्षतेखालील निवडणूक टास्क फोर्सच्या सुरक्षा आणि गुप्तचर धोक्यांबद्दल पॅनेलला नियमित अपडेट्स मिळत असतात.
कॅनडासाठी धोका असलेल्या बहुतेक घटकांनी परकीय हस्तक्षेप लपविण्यासाठी त्यांचे व्यापारी कौशल्य अनुकूल केले असेल, त्यामुळे त्यांना शोधणे आणखी आव्हानात्मक बनले आहे, असे त्या म्हणाल्या.
चीन संघीय निवडणूक प्रचारात हस्तक्षेप करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) द्वारे सक्षम साधनांचा वापर करण्याची दाट शक्यता आहे आणि त्याच्या हितासाठी अनुकूल असलेल्या काल्पनिक दाव्यांना प्रोत्साहन देण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करण्याची दाट शक्यता आहे. हे विशेषतः कॅनडामधील चिनी वांशिक, सांस्कृतिक आणि धार्मिक समुदायांना फसव्या मार्गांनी लक्ष्य करण्यासाठी केले जाईल. तसाच प्रयत्न रशिया आणि पाकिस्तानकडूनही केला जाऊ शकतो, असेही त्या म्हणाल्या.