लंडन – भारताने आपल्याकडे असलेल्या अण्वस्त्रांच्या साठ्यात दहाने वाढ केली असली तरी अद्याप भारताकडे असलेला अण्वस्त्रांचा साठा हा चीन किंवा पाकिस्तान पेक्षाही कमी आहे असा दावा एका स्वीडीश थिंक टॅंकने आपल्या अहवालात केला आहे. स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च संस्थेने हा अहवाल तयार केला आहे. त्यांच्या अहवाला नुसार चीनकडे 320 अण्वस्त्रे असून पाकिस्तानकडे 160 अण्वस्त्रे आहेत. तर भारताकडील अण्वस्त्रांची संख्या 150 इतकीच आहे.
या अहवालात म्हटले आहे की, चीनने अलीकडच्या काळात आपली अण्वस्त्र मारक क्षमता मोठ्या प्रमाणात वाढवली असून जमीन आणि समुद्रातूनही मारा करता येतील अशी नवीन क्षेपणास्त्रे त्यांनी विकसित केली आहे. विमानातूनही अण्वस्त्रे डागण्याची त्यांनी यंत्रणा विकसित केली आहे. त्यांचा हा अहवाल सन 2019 च्या स्थितीचा आहे.
त्या सालच्या नेमक्या आकडेवारीनुसार चीनची अण्वस्त्रे 290 इतकी होती तर भारताची 130 ते 140 इतकी होती. पाकिस्तानकडे असलेल्या अण्वस्त्रांची संख्या 150 ते 160 इतकी आहे. जगात सर्वाधिक अण्वस्त्रें अमेरिकेकडे आहेत. त्याची एकूण संख्या 5800 इतकी आहे. रशियाकडेही जवळपास तितकीच अण्वस्त्रे आहेत.
ब्रिटनकडील अण्वस्त्रांची संख्या 215 इतकी आहे. जगात अमेरिका, रशिया, ब्रिटन, फ्रांस, चीन, भारत, इस्त्रायल, पाकिस्तान, आणि उत्तर कोरिया ही एकूण नऊ अण्वस्त्रधारी राष्ट्रे असून त्यांच्याकडील अण्वस्त्रांची एकूण संख्या 13400 इतकी आहे. त्यातील 90 टक्के अण्वस्त्रे अमेरिका आणि रशिया याच दोन देशांमध्ये आहेत.