सिडनी : चॅम्पियन्स करंडक स्पर्धेला सुरुवात होऊन जवळपास आठवडा लोटला आहे. भारत आपले सर्व सामने दुबईमध्ये खेळणार आहे. मात्र इतर संघ पाकिस्तानमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी खेळत आहेत. त्यामुळे भारत एकाच ठिकाणी आपल्या लढती खेळत असल्याने भारतीय संघाला फायदा होत असल्याचा दावा दुखापतीमुळे चॅम्पियन्स करंडक स्पर्धेत खेळत नसलेला ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने केला आहे.
सुरक्षेच्या कारणास्तव भारताने पाकिस्तानला जाण्यास नकार दिला होता. यानंतर, हायब्रिड मॉडेल अंतर्गत स्पर्धा आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला ज्यानुसार भारतीय संघ त्यांचे सर्व सामने दुबईमध्ये खेळेल. जर रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघ अंतिम फेरीत पोहोचला तर तोही दुबईमध्ये खेळवला जाणार आहे. ही स्पर्धा आयोजित केली जात आहे हे खूप छान आहे, पण अर्थातच एकाच मैदानावर खेळल्याचा प्रत्येकाला फायदा मिळतो.
भारताचा संघ आधीच खूप मजबूत आहे आणि त्यांना त्यांचे सर्व सामने एकाच ठिकाणी खेळणार असल्याने निश्चितच इतर संघापेक्षा भारताला दुबईतील मैदानावर जास्त फायदा मिळणार असल्याचे कमिन्सने याहू ऑस्ट्रेलियाला सांगितले. भारताने बांगलादेश आणि पाकिस्तानविरुद्ध सहज विजय मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. भारताची साखळी फेरीतील न्यूझीलंड सोबत लढत शिल्लक असून, भारत उपांत्य फेरीचा सामना ४ मार्च रोजी खेळणार आहे.