नवी दिल्ली – संरक्षण, उर्जा आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील सहकार्यासाठी भारत, फ्रान्स आणि संयुक्त अरब अमिराती दरम्यान सहकार्याचा त्रिस्तरीय करार करण्यात आला आहे. युक्रेनमधील संघर्षाच्या पार्श्वभुमीवर भूराजकीय स्थिती तणावग्रस्त बनलेली असताना हा त्रिस्तरिय कराराचा आराखडा निश्चित करण्यात आला आहे.
परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर, फ्रान्सच्या परराष्ट्र मंत्री कॅथरीन कोलोना आणि संयुक्त अरब अमिरातीचे परराष्ट्र मंत्री अब्दुल्ला बिन झ्यायेद अल नह्यान यांच्यादरम्यान फोनवरून झालेल्या चर्चेदरम्यान या त्रिस्तरिय कराराचा आराखडा निश्चित करण्यात आला.
या करारामध्ये संरक्षणातील सहकार्य हा तिन्ही देशांसाठीचा सर्वात निकटचा मुद्दा असणार आहे, असे परराष्ट्र मंत्रालयाच्यावतीने प्रसिद्धीस देण्यात आलेल्या संयुक्त निवेदनामध्ये म्हटले आहे. या करारानुसार काल सुसंगतता आणि संयुक्त विकनशीलतेच्या मुद्यावर भर देण्यात येणार आहे. याशिवाय संरक्षण क्षेत्रातील प्रशिक्षण आणि उत्पादनासाठी सहकार्याचाही यामध्ये समावेश असणार आहे.
फ्रान्स आणि युएईने अन्न सुरक्षा, चक्राकार अर्थव्यवस्था या क्षेत्रांमधील सहकार्याबरोबर तिन्ही देशांमधील विकास एजन्सींमधील सहकार्यालादेखील सहमती दर्शवली आहे. यामुळे तिन्ही देशांदरम्यान आर्थिक, तांत्रिक आणि सामाजिक धोरणांमध्ये सुसंगता निर्माण होण्यास मदत होणार आहे. यातूनच पॅरिस कराराच्या उद्दिष्टांना साद्य करणे देखील शक्य होणार आहे, असेही या संयुक्त निवेदनात म्हटले आहे.