नवी दिल्ली – मंकीपॉक्सबाबत दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. देशातील पहिला मंकीपॉक्सचा रुग्ण संसर्गमुक्त झाला असून त्याचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. याबाबत माहिती देताना केरळच्या आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांनी सांगितले की, केरळमध्ये उपचार घेत असलेली भारतातील पहिली मंकीपॉक्स रुग्ण या आजारातून बरी झाली आहे. देशातील मंकीपॉक्सची ही पहिलीच केस असल्याने नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीच्या (एनआयव्ही) सूचनेनुसार 72 तासांच्या अंतराने दोन चाचण्या करण्यात आल्या आणि दोन्ही वेळा रिपोर्ट निगेटिव्ह आले. रुग्ण शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या निरोगी आहे. त्वचेचे डाग पूर्णपणे बरे झाले आहेत. त्याला आज डिस्चार्ज देण्यात येणार आहे.
केरळमधील कोल्लममध्ये आढळला होता मंकीपॉक्सचा पहिला रुग्ण
14 जुलै रोजी परदेशातून परतलेल्या केरळमधील कोल्लम येथील रहिवासी असलेल्या व्यक्तीमध्ये मंकीपॉक्सचा संसर्ग आढळून आला होता. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, आता 16 दिवसांनी तो पूर्णपणे निरोगी आहे.
मंकीपॉक्स संसर्गाची लक्षणे काय आहेत?
डब्ल्यूएचओच्या मते, मंकीपॉक्स संसर्गाचा उष्मायन कालावधी (संसर्गापासून लक्षणे सुरू होण्यापर्यंत) साधारणपणे 6 ते 13 दिवसांचा असतो, जरी काही लोकांमध्ये तो 5 ते 21 दिवसांपर्यंत असू शकतो. संसर्ग झालेल्या व्यक्तीला ताप, तीव्र डोकेदुखी, लिम्फॅडेनोपॅथी (लिम्फ नोड्सची जळजळ), पाठ आणि स्नायू दुखणे यासह तीव्र अशक्तपणा येऊ शकतो. सूजलेल्या लिम्फ नोड्सची समस्या हे सर्वात सामान्य लक्षण मानले जाते. याशिवाय रुग्णाच्या चेहऱ्यावर आणि हात-पायांवर मोठ्या आकाराचे पुरळ येऊ शकतात. काही गंभीर संक्रमणांमध्ये, या पुरळ डोळ्याच्या कॉर्नियावर देखील परिणाम करू शकतात.