#WIAvIND : पूजाराचे शतक; भारत मजबूत स्थितीत

मधल्या फळीत रोहित चमकला

कुलीज, वेस्ट इंडिज – कसोटीतील भरवशाचा फलंदाज चेतेश्वर पुजाराने नाबाद शतक टोलवित आगामी कसोटी मालिकेसाठी आपण सज्ज असल्याची झलक दाखविली. त्यामुळेच भारताने वेस्ट इंडिज ‘अ’ संघाविरूद्धच्या तीन दिवसांच्या क्रिकेट लढतीत पहिल्या डावात 5 बाद 297 धावांपर्यंत मजल गाठली. रोहित शर्माने शानदार अर्धशतक करीत मधल्या फळीतही आपण चमक दाखवू शकतो याचा प्रत्यय घडविला.

भारत व वेस्ट इंडिज यांच्यातील पहिली कसोटी 22 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. त्यापूर्वी सराव म्हणून येथे तीन दिवसांचा सामना घेण्यात आला आहे. पुजाराने आठ महिन्यांपूर्वी सिडने येथे ऑस्ट्रेलियाविरूद्ध कसोटी सामना खेळला होता. त्यामुळेच त्याच्या खेळाबाबत उत्सुकता होती. आपल्या नावलौकिकास साजेसा खेळ करीत शतक ठोकले. त्याने रोहितच्या साथीत चौथ्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली.

कसोटीपूर्वी भारतीय संघाच्या फलंदाजांच्या स्थानाविषयी अंदाज घेण्यासाठी या सामन्यात लोकेश राहुल व मयांक अग्रवाल यांना सलामीस पाठविण्यात आला. अग्रवालने 12 धावा करीत निराशा केली. राहुलने 5 चौकार व 1 षटकारासह 36 धावा केल्या. मोठी खेळी करणार असे वाटत असतानाच त्याला तंबूचा रस्ता पकडावा लागला. या सामन्यात विराट कोहलीने विश्रांती घेतल्यामुळे त्याच्या जागी नेतृत्व करणारा अजिंक्‍य रहाणे हा केवळ एक धाव काढून बाद झाला. तो बाद झाला, त्यावेळी भारताची 3 बाद 53 अशी स्थिती होती.

संघाचा डाव सावरण्याबाबत माहीर असलेल्या पुजाराने रोहित शर्माच्या साथीत आत्मविश्‍वासाने खेळ केला. त्यांनी विंडीजच्या संमिश्र माऱ्यास तोंड देत 132 धावांची भर घातली. रोहितने 8 चौकार व 1 षटकारासह 68 धावा केल्या. पुजारा शतक पूर्ण झाल्यानंतर निवृत्त झाला. त्याने 187 चेंडूंमध्ये नाबाद 100 धावा केल्या. त्यामध्ये त्याने 8 चौकार व 1 षटकार अशी फटकेबाजी केली. चांगल्या कामगिरीची अपेक्षा असलेल्या ऋषभ पंतने पुन्हा निराशा केली. त्याने 4 चौकार व 1 षटकारासह 33 धावा केल्या. वेस्ट इंडिज “अ’ संघाविरूद्ध भारत “अ’ संघाचे नेतृत्व करणारा हनुमा विहारीने नाबाद 37 धावांची आश्‍वासक खेळी केली. वेस्ट इंडिज “अ’ संघाकडून जोनाथन कार्टरने सर्वाधिक तीन गडी बाद केले.

संक्षिप्त धावफलक –

भारत पहिला डाव 88.5 षटकांत 5 बाद 297 (चेतेश्‍वर पुजारा नाबाद 100, रोहित शर्मा 68, हनुमा विहारी नाबाद 37, जोनाथन कार्टर 3-39)

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×