जागतिक मैदानी स्पर्धा
दोहा, दि. 30 – भारतीय धावपटूंना जागतिक मैदानी स्पर्धेतील 4 बाय 400 मीटर्स मिश्र रिले शर्यतीत सातव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. त्यांनी या स्पर्धेच्या अंतिम फेरीत स्थान मिळवित यापूर्वीच ऑलिम्पिक स्पर्धेचे तिकीत निश्चित केले होते.
भारतीय संघात मोहम्मद अनस, व्ही.के.विस्मया, निर्मल नोह टॉम व जिस्ना मॅथ्युज यांचा समावेश होता. त्यांनी गतवर्षी आशियाई क्रीडा स्पर्धेत विजेतेपद मिळविताना तीन मिनिटे 15.71 सेकंद वेळ नोंदविली होती. येथे त्यांना ही शर्यत पार करण्यास तीन मिनिटे 15.77 सेकंद वेळ लागला.
येथील शर्यतीमधील आठव्या लेनमध्ये भारताला धावण्याची संधी मिळाली होती. अनस, विस्मया, निर्मल व जिस्ना या क्रमाने भारतीय खेळाडू धावले. निम्मी शर्यत झाली त्यावेळी भारत शेवटच्या क्रमांकावर होता. तथापि निर्मलने वेगात ही शर्यत पार करीत सातव्या क्रमांकावर झेप घेतली. जिस्नीनेही चांगला वेग ठेवीत संघास सातवे स्थान मिळवून दिले. भारतीय संघाने रविवारी ही शर्यत 3 मिनिटे 16.14 सेकंद या ऑलिम्पिक पात्रता वेळेत पार केली होती.
अमेरिकेने ही शर्यत 3 मिनिटे 9.34 सेकंदात जिंकली. जमेका (3 मिनिटे 11.78 सेकंद) व बहारिन (3 मिनिटे 11.82 सेकंद) यांना अनुक्रमे रौप्य व ब्रॉंझपदक मिळाले.