Mercedes-Benz: भारत -युरोपियन समुदायादरम्यान मुक्त व्यापार करार होणार आहे. त्यामुळे भारतात वाहन क्षेत्रातील नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान विकासाला चालना मिळणार आहे असे मत मर्सिडीज बेंझ इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक संतोष अय्यर यांनी व्यक्त केले. या चर्चेबाबत समाधान व्यक्त करताना अय्यर यांनी सांगितले की, भारतीय अर्थव्यवस्था आता जागतिक दर्जाची झाली आहे. जगातील मोठे देश आणि देशांचे समुदाय भारताबरोबर व्यापार करार करण्यास उत्सुक आहेत हे यातून स्पष्ट होते. या करारामुळे भारतातील वाहन उद्योगाला चालना मिळणार आहे. युरोपमधील वाहन कंपन्यांचे तंत्रज्ञान भारतातील कंपन्यांना उपलब्ध होऊ शकेल. तंत्रज्ञान हस्तांतरण अधिक सोपे होऊ शकणार आहे. लवकरच कराराची कागदपत्रे उपलब्ध होतील आणि त्यामध्ये इतर बाबी स्पष्ट होतील असे मत त्यांनी व्यक्त केले. दर कपात होणार नाही – दरम्यान हा करार झाल्यानंतर युरोपातील कंपन्यांच्या भारतातील वाहनाची दरकपात होईल का याबाबत त्यांनी नकारात्मक उत्तर दिले. ते म्हणाले की, मर्सिडीज बेंझ इंडियाची 90% उत्पादने भारतातच तयार केली जातात. उरलेली केवळ दहा टक्के उत्पादने देशांमध्ये आयात केली जातात. अशा परिस्थितीत 90% उत्पादनाच्या किमतीवर या करारामुळे कसलाही परिणाम होण्याची शक्यता कमी आहे. अशा परिस्थितीत या करारामुळे आमच्या उत्पादनाच्या किमती कमी होण्याची शक्यता कमी आहे असे ते म्हणाले. उलट युरोच्या तुलनेत रुपयाचे डॉलरपेक्षा जास्त अवमूल्यन झाले आहे. त्यामुळे ज्या कंपन्या काही सुटे भाग युरोपातून आयात करतात त्या सुट्या भागाची किंमत वाढलेली आहे. अशा परिस्थितीत पुढील वर्षी प्रत्येक तिमाहीत आपल्या वाहनाच्या दरात वाढ करण्याची घोषणा या अगोदरच या कंपनीने केली आहे. अर्थसंकल्पात रुपयाचे मूल्य स्थिर करण्यासंदर्भात काही सकारात्मक घोषणा झाल्या आणि रुपयाचे मूल्य घसरले नाही तर ही दरवाढ कळवू शकेल असे समजले जात आहे.