India-EU FTA: भारत आणि युरोपियन समुदाया दरम्यान मुक्त व्यापार कराराची बोलणी समाप्त झाली आहे. अशा परिस्थितीत युरोपातील वाहन कंपन्यांच्या आयातीवरील शुल्क कमी होणार आहे. यामुळे भारतातील वाहन कंपन्यासमोरील स्पर्धा वाढणार आहे. परिणामी भारतातील वाहन कंपन्यांच्या शेअरच्या भावात घट झाली. महिंद्रा कंपनीच्या शेअर चा भाव 4.19 टक्क्यांनी कमी झाला. तर ह्युंदाई मोटार इंडिया कंपनीच्या शेअरचा भाव 4.02 टक्क्यांनी कमी झाला. महिंद्रा कंपनी भारतातील आहे. तर ह्युंदाई मोटर इंडिया कंपनीची भारतीय शेअर बाजारावर नोंदणी झालेली आहे. मारुती सुझुकी इंडिया या कंपनीच्या शेअरचा भाव 1.48 टक्क्यांनी, टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेईकल्स कंपनीच्या शेअरचा भाव 1.22 टक्क्यांनी, एमआरएफ कंपनीच्या शेअरचा भाव 1.20 टक्क्यांनी, हिरो मोटो कॉर्प कंपनीच्या शेअरचा भाव 0.24 टक्क्यांनी, अशोक लेलँड कंपनीच्या शेअरचा भाव 0.05 टक्क्यांनी कमी झाला. अशा अवस्थेत मुंबई शहर बाजाराचा वाहन क्षेत्राचा निर्देशांक 0.97 टक्क्यांनी कमी होऊन 58,980 अंकावर गेला होता. विशेष म्हणजे शेअर बाजाराचे मुख्य निर्देशांक वाढले. मात्र वाहन कंपन्यांचा निर्देशांक कमी झाला आहे. वाहन कंपन्याबरोबरच भारतातील मद्य निर्माण करणार्या कंपन्यांच्या शेअरच्या भावातही घट झाली आहे. कारण टप्प्याटप्प्याने युरोपात तयार होणार्या मद्यावरील आयात शुल्कात कपात केली जाणार आहे. या करारातील तरतुदीनुसार युरोपात तयार होणार्या लक्झरी कारवरील आयात शुल्क कमी केले जाणार आहे. अशा परिस्थितीत या आयात कार भारतीय नागरिकांना तुलनेने स्वस्त दरात उपलब्ध होणार आहेत. युरोपियन कार कंपन्यांचे तंत्रज्ञान जागतिक दर्जाचे आहे. त्यांच्या कार अतिशय आरामदायक असतात. परिस्थितीत भारतातील ग्राहकांना या कार घेण्याची इच्छा असते. मात्र या कारवरील शुल्क प्रसंगी 110 टक्क्यापर्यंत असल्यामुळे या कार महागात पडत होत्या. आता या कार काही प्रमाणात स्वस्त होणार असल्यामुळे भारतातील श्रीमंतांना या कार तुलनेने कमी किमतीत खरेदी करता येणार आहेत. त्यामुळे साहजिकच भारतातील कंपन्यासमोरील स्पर्धा वाढणार आहे.