नवी दिल्ली – सरलेल्या दहा वर्षात म्हणजे 2015 ते 2025 या कालावधीत राष्ट्रीय उत्पन्न वाढीत म्हणजे जीडीपी वाढीत भारताने सर्वोत्कृष्ट कामगिरी केली आहे. या कालावधीत करोना आणि व्यापार युद्धासारखे पेच प्रसंग निर्माण झाले असूनही इतर देशापेक्षा भारताने चांगली कामगिरी केल्याची आकडेवारी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने जारी केली आहे.
नाणेनिधीने उपलब्ध केलेल्या आकडेवारीनुसार या कालावधीत भारताचे राष्ट्रीय उत्पन्न 2.1 लाख कोटी डॉलरवरून 4.3 लाख कोटी डॉलर झाले आहे. म्हणजे या कालावधीत महागाईचा समावेश केला नाही तर भारताचे राष्ट्रीय उत्पन्न 105 टक्क्यांनी वाढले आहे. तर मग महागाईच्या आकडेवारीचा विचार केल्यानंतर या कालावधीत भारताचे राष्ट्रीय उत्पन्न 77 टक्क्यांनी वाढले आहे.
अशी कामगिरी या कालावधीत इतर कोणत्याही देशाला करता आलेली नाही. यामुळे या दहा वर्षात भारत जगातील पाच सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थामध्ये सामील झाला आहे. 2025 मध्ये भारत जपानला तर 2027 मध्ये जर्मनीला मागे टाकून जगातील सर्वात मोठी तिसरी अर्थव्यवस्था होणार आहे.
चीन दुसर्या क्रमांकावर –
गेल्या दहा वर्षांमध्ये चीनची अर्थव्यवस्था 74 टक्क्यांनी वाढून 11.2 लाख कोटी डॉलरवरून 19.5 लाख कोटी डॉलरची झाली आहे. या कालावधीत जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेल्या अमेरिकेचे राष्ट्रीय उत्पन्न 23.7 लाख कोटी डॉलर वरून 30.3 लाख कोटी डॉलर वर गेले आहे. म्हणजे या कालावधीत अमेरिकेचे राष्ट्रीय उत्पन्न केवळ 28 टक्क्यांनी वाढले आहे.
ब्राझीलची खराब कामगिरी –
भारताचा स्पर्धक देश असलेल्या ब्राझीलचे राष्ट्रीय उत्पन्न या कालावधीत केवळ आठ टक्क्यांनी वाढून 2.1 लाख कोटी डॉलर वरून 2.3 लाख कोटी डॉलरवर गेले आहे. त्याचबरोबर ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी, जपान या विकसित देशाचे राष्ट्रीय उत्पन्न या कालावधीत केवळ 6 ते 14 टक्क्यांनी वाढले आहे. म्हणजे या कालावधीत भारताने राष्ट्रीय उत्पन्न वाढीत सर्वात चांगली कामगिरी केली आहे. आगामी काळात भारत याच वेगाने आगेकूच करणार आहे.