#WIAvIND : अनिर्णित सामन्यात भारताचे वर्चस्व

कुलिज, (अँटिग्वा) : भारत व वेस्ट इंडिज “अ’ यांच्यातील तीन दिवसांचा क्रिकेट सामना अपेक्षेप्रमाणे अनिर्णित राहिला. मात्र या सामन्यात शेवट्‌पर्यंत भारताचेच वर्चस्व राहिले. अजिंक्‍य रहाणे व हनुमा विहारी यांनी केलेली अर्धशतके हेच भारताच्या दुसऱ्या डावाचे वैशिट्य ठरले.

भारताने 1 बाद 84 धावसंख्येवरून दुसऱ्या डावात 78 षटकांमध्ये 5 बाद 188 धावा केल्या आणि डाव घोषित केला. रहाणे व विहारी यांनी दुसऱ्या विकेटसाठी 96 धावांची भागीदारी करीत त्यामध्ये मोठा वाटा उचलला. विजयासाठी 305 धावांचा पाठलाग करताना विंडीज “अ’ संघाने 21 षटकांत 3 बाद 47 धावा केल्यानंतर सामना अनिर्णित म्हणून खेळ थांबविण्यात आला. भारत व विंडीज यांच्यातील पहिल्या कसोटीस 22 ऑगस्टपासून नॉर्थ साऊंड स्टेडियमवर प्रारंभ होणार आहे.

रहाणे व विहारी यांनी संघाच्या दुसऱ्या डावास पुढे सुरूवात केली. रहाणेने जरी अर्धशतक केले तरीही त्याच्या खेळात पूर्वीसारखा आत्मविश्‍वास दिसून आला नाही. त्यामुळेच की काय त्याला 54 धावा काढताना 162 चेंडूंची मदत घ्यावी लागली. त्याने 5 चौकाराबरोबरच एक षटकाराही मारला. विहारीने 125 चेंडूंमध्ये 64 धावा करताना 9 चौकार व एक षटकार अशी फटकेबाजी केली. चांगल्या कामगिरीची अपेक्षा असलेल्या ऋषभ पंतने निराशा केली. केवळ 19 धावा काढून तो धावबाद झाला. रवींद्र जडेजाने 9 धावा करीत अपेक्षाभंग केला. रिद्धीमान साह व रवीचंद्रन अश्‍विन हे अनुक्रमे 14 व 10 धावा काढून नाबाद राहिले. भारताने उपहारानंतर दुसरा डाव घोषित केला. चहापानापर्यंत विंडीजने 3 बाद 47 धावा केल्यानंतर दोन्ही संघांनी सामना अनिर्णित ठेवण्याचा निर्णय घेतला.

पहिल्या डावाप्रमाणेच दुसऱ्या डावातही विंडीजच्या फलंदाजांना भारतीय गोलंदाजांपुढे संघर्ष करावा लागला. भारताकडून जसप्रित बुमराह, अश्‍विन व जडेजा यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
या सामन्यात पहिल्या डावात इशांत शर्मा, उमेश यादव यांच्याबरोबरच कुलदीप यादवनेही तीन गडी बाद करीत कसोटीत स्थान मिळवण्यासाठी आपली बाजू भक्कम केली आहे.

संक्षिप्त धावफलक –

भारत : पहिला डाव 5 बाद 297 घोषित व दुसरा डाव 5 बाद 188 घोषित (अजिंक्‍य रहाणे 54, हनुमा विहारी 64, अकिम फ्रेझर 2-43, रोमारिओ शेपर्ड 1-3, खॅरी पिअरी 1-72)
वेस्ट इंडिज ‘अ’ : पहिला डाव 181 व दुसरा डाव 21 षटकांत 3 बाद 47 (जसप्रित बुमराह 1-13, रवीचंद्रन अश्‍विन 1-18, रवींद्र जडेजा 1-3)

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×