भारतात या टप्प्यात तरी कोविड बूस्टर डोसची गरज नाही ; आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केले मत

नवी दिल्ली –  भारतात सध्याच्या टप्प्यात तरी कोविड लसीचा तिसरा बूस्टर डोस देण्याची गरज नाही असे मत या क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्‍त केले आहे. देशातील बहुतांशी लोकसंख्येला कोविडचे दोन्ही डोस देऊन झाले असतील तर त्यानंतरच्या स्थितीत कोविडचा बूस्टर डोस देण्याच्या संबंधात विचार केला जाऊ शकतो. पण अजून दोन्ही डोस मिळालेल्या नागरीकांची संख्या 25 टक्‍क्‍यांपेक्षाही कमी असताना बूस्टर डोस देण्याची गरज नाही असे या क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

रोगप्रतिकारक शक्ती या विषयीचे तज्ज्ञ सत्यजीत रथ यांनी म्हटले आहे की, सध्या देशातील केवळ पंधरा टक्‍क्‍यांपेक्षा कमी प्रौढांनाच आत्तापर्यंत कोविड लसीचे दोन्ही डोस देऊन झाले आहेत. लोकांना या साथीपासून वाचवण्यासाठी हे प्रमाण खूपच कमी आहे. त्यामुळे आधी सर्वांना दोन डोस मिळाल्याशिवाय तिसऱ्या बुस्टर डोसवर आत्ताच विचार करणे अयोग्य आहे. ज्यांना दोन डोस मिळाले आहेत त्यांचे कोविड पासून बहुतांशी संरक्षण होताना दिसत आहे.

याच क्षेत्रातील दुसऱ्या तज्ज्ञ विनीता बाळ यांनी म्हटले आहे की, ज्यांना पुर्वीचे काही आजार आहेत त्यांना केस बाय केस विचार करून तिसरा बूस्टर डोस देण्यास हरकत नाही. पण आधी सगळ्याच जनतेचे लसीकरण पुर्ण करणे याला प्राधान्य दिले जावे असे मत त्यांनी व्यक्त केले.

भारतात अजून बूस्टर डोस देणे सुरू करण्यात आले नसले तरी मुंबईतील आरोग्य विभाग कर्मचारी आणि काही राजकीय नेत्यांनी बूस्टर डोस घेतले असल्याचे वृत्त काही ठिकाणी छापून आले आहे. आयसीएमआरचे महासंचालक बलराम भार्गव यांनीही म्हटले आहे की तिसरा डोस ही आमची सध्याची प्रायॉरिटी नाही. आधी सगळ्यांना दोन्ही डोस देणे यावर आम्ही सध्या लक्ष केंद्रीत करून आहोत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.