चीनसीमेवर सर्जिकल स्ट्राईक करणारी पथके भारताकडून तैनात

लडाख : चीनबरोबर लडाखच्या पूर्व भागातील सीमेवर असणाऱ्या तणावाच्या पार्श्‍वभूमीवर भारताने गरज भासल्यास कारवाईत भाग घेण्यासाठी विशेष पथके तैनात केली आहेत. देशभरात विविध ठिकाणी तैनात असणारी निम विशेष दले लडाखला हलवण्यात आली आहेत. त्यांनी आपला सरावही सुरू केला असल्याची माहिती सरकारमधील वरीष्ठ सूत्रांनी दिली.

या विशेष दलांनी 2017मधील सर्जिकल स्ट्राईकमध्ये महत्वाची भूमिका बजावली होती. त्यामुळे गरज भासेल त्यावेळी या पथकांचा योग्य आणि परिणामकारक वापर करता येईल, असा होरा आहे.

नुकतेच हाती आलेल्या वृत्तानुसार, पूर्व लडाखमधील मोक्‍याच्या ठिकाणी या फौजा तैनात करण्यात आल्या आहेत. चीनशी संघर्ष उद्‌भवल्यास त्यांना बजावयाच्या कामगिरीची त्यांनी पूर्ण तयारी केली आहे.

भारताकडे अशा विशेष दलांच्या 12 तुकड्या आहेत. त्यांना वेगवेळ्या भूभागावर कसे लढावे याचे प्रशिक्षण देण्यात येते, वाळवंट, पर्वतीय क्षेत्र आणि जंगल भगात मुख्यत: त्यांना तैनात करण्यात येते. जम्मू आणि लेह सारख्या अतीशीत प्रदेशात त्यांना अनेकदा तैनात करण्यात येते.

सर्जिकल स्ट्राईकच्या काळात या दलांनी दहशतवादी तळांवर हल्ले करून ते नेस्तनाबूत केले होतेच. शिवाय तेथे तैनात असणाऱ्या पाकिस्तानी जवानांचेही शिरकाण करून वेगवेगळ्या मार्गाने ते भारतात परत आले होते.

प्रत्यक्ष ताबा रेषेवर भारत आणि चीनमध्ये तणावाचे वातावरण आहे. 15 जूनला तेथे दोन्ही लष्करांमध्ये संघर्ष उडाला होता.

Leave A Reply

Your email address will not be published.