बुयनोस आयर्स -भारतीय हॉकी संघाने अर्जेंटिनाविरुद्धच्या सामन्यात आणखी एक दिमाखदार विजयाची नोंद केली. ऑलिम्पिक विजेत्या अर्जेंटिनाचा भारतीय संघाने चक्क 3-0 असा दणदणीत पराभव केला व जागतिक क्रमवारीत चौथे स्थान मिळवले.
या सामन्यात भारताच्या हरमनप्रीत सिंगने 11 व्या, ललित उपाध्यायने 25 व्या आणि मनदीप सिंगने 58 व्या मिनिटाला गोल केले व संघाला अभूतपूर्व विजय मिळवून दिला. त्यापूर्वी झालेल्या लढतीतही भारतीय संघानेच वर्चस्व राखले.
तत्पूर्वी झालेल्या सामन्यात हरमनप्रीत सिंगने केलेल्या अफलातून कामगिरीच्या जोरावर भारताने एफआयएच प्रो हॉकी लीगमध्ये पेनल्टी शूटआऊटमध्ये अर्जेंटिनावर 3-2 अशी मात केली. करोनाच्या धोक्यानंतर जवळपास 11 महिन्यांनी भारतीय पुरुष हॉकी संघ पहिल्यांदाच मैदानात उतरला. प्रो हॉकी लीगमध्ये झालेल्या या पहिल्या सामन्यात हरमनप्रीतने 21व्या मिनिटाला गोल करत भारताला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली होती.
मात्र, मार्टिन फेरेरो याने 28व्या व 30व्या मिनिटाला गोल करत अर्जेंटिनाला आघाडी मिळवून दिली. 60व्या मिनिटापर्यंत अर्जेंटिनाने ही आघाडी कायम राखली होती. सामना संपायला अवघ्या काही सेकंदांचा खेळ शिल्लक असताना हरमनप्रीतने मिळालेल्या पेनल्टीकॉर्नरवर अफलातून गोल करत हा सामना 2-2 असा बरोबरीत आणला. पेनल्टी-शूटआऊटमध्ये निकोलस कीनन आणि लुकास मार्टिनेझ यांनी पहिल्या दोन प्रयत्नांत गोल केले.
मात्र त्यानंतर श्रीजेशने सर्वोत्तम गोलरक्षण म्हणून आपली गुणवत्ता सिद्ध करताना लुकास विया, मार्टिन फेरेरो आणि इग्नॅसियो ऑर्टिझ यांचे फटके अडवले. भारताकडून ललित उपाध्याय, रुपिंदरपाल सिंग आणि दिलप्रीत सिंग यांनी गोल केले. पहिल्या प्रयत्नांत हरमनप्रीतला तर चौथ्या प्रयत्नांत शमशेर सिंगला गोल करण्यात अपयश आले.
बोनस गुणांची कमाई
हा सामना बरोबरीत सोडवल्यामुळे दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण मिळाला, पण गोलरक्षक पीआर श्रीजेशने केलेल्या अप्रतिम कामगिरीमुळे भारताने एका बोनस गुणाची कमाई केली. स्पर्धेच्या नियमानुसार, शूट-आऊटमध्ये विजय मिळवणाऱ्या संघाला बोनस गुण देण्यात येतो. हरमनप्रीतला सामन्यातील सर्वोत्तम खेळाडूच्या पुरस्काराने गौरवण्यात आले. उभय संघांमधील दुसरा सामना रविवारी होणार आहे.