फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांवर होणाऱ्या व्यक्तीगत टीकेचा भारताकडून निषेध

नवी दिल्ली : फ्रान्सच्या शिक्षकावर क्रूर पद्धतीने दहशतवादी हल्ला करून त्यांची हत्या करण्यात आल्यानंतर फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इम्यॅनूएल मॅक्रॉन यांनी हत्येचा तीव्र शब्दात निषेध नोंदवला आहे. मात्र त्यांनी केलेल्या निषेधानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांच्यावर टीका करण्यात येत आहे. मात्र या टीकेचा समाचार घेत भारताने फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांना आपला पाठिंबा दर्शवला आहे.

फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यावर होणाऱ्या व्यक्तीगत टीकेचा भारताने निषेध केला आहे. मॅक्रॉन यांनी इस्लाम आणि कट्टरपंथीय विचारधारेबद्दल, जी भूमिका घेतलीय त्यावरुन त्यांचा मुस्लिम देशांमध्ये निषेध सुरु आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने इमॅन्युएल मॅक्रॉन यांचे समर्थन केले आहे. मॅक्रॉन यांच्यावर होणारी व्यक्तीगत स्वरुपाची टीका हे आंतरराष्ट्रीय मानकांचे उल्लंघन असल्याचे भारताने म्हटले आहे.

सार्वजनिक ठिकाणी ज्या क्रूर पद्धतीने फ्रेंच शिक्षकाचा शिरच्छेद करण्यात आला, त्याचाही परराष्ट्र मंत्रालयाने निषेध केला आहे. कुठल्याही परिस्थितीत आणि कुठल्याही कारणासाठी दहशतवादाचे समर्थन करता येणार नाही, असेही भारताने पत्रकात म्हटले आहे. इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी जी भूमिका घेतलीय, त्यावरुन मुस्लिम देशांमध्ये मोठया प्रमाणावर संताप आहे. मॅक्रॉन यांच्याविरोधात निदर्शने सुरु आहेत.

“राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यावर ज्या भाषेमध्ये व्यक्तीगत स्वरुपाचे हल्ले करण्यात येत आहेत, त्याचा आम्ही निषेध करतो. काही आंतरराष्ट्रीय मानक आहेत, त्याचे हे उल्लंघन आहे. फ्रेंच शिक्षकावर ज्या क्रूर पद्धतीने दहशतवादी हल्ला करण्याता आला, त्याचाही आम्ही निषेध करतो. संपूर्ण जगाला या घटनेने हादरवून सोडले. फ्रान्सची जनता आणि त्या शिक्षकाच्या कुटुंबीयाच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत” असे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.