नवी दिल्ली – लडाखमध्ये असणाऱ्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारत आणि चीनमध्ये तब्बल 11 आठवड्यानंतर राजनैतिक पातळीवर चर्चा सुरू झाली. चर्चेसाठी कार्यकारी यंत्रणा आणि सीमांच्या मुद्द्यावर समन्वय समितीशी संबंधित मुत्सद्द्यांची व्हर्चुअल बैठक सुरू आहे. यात सीमेवर असणाऱ्या ताणावाबाबत चर्चा होईल, अशी अपेक्षा आहे.
ही चर्चा यापुर्वी 30 सप्टेंबरला झाली होती. त्यात सीमेवरून सैन्य मागे घेण्याबाबत कोणताही तोडगा निघाला नव्हता. या चर्चेत सैन्य माघारीच्या मुद्द्यावरच जोर राहील, असे चीनमधील राजनैतिक सूत्रांनी सांगितले. मुंबईतील एशीया सोसायटी सेंटर मध्ये होणाऱ्या कार्यक्रमात चीनचे परराष्ट्र मंत्री वॅंग यी आणि चीनचे भारतातील राजदूत सहभागी होणार आहेत. त्यांच्या व्याख्यानानंतर या चर्चेची सांगता होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
वॅंग त्यांच्या भाषणात भारत आणि चीन यांच्यातील द्वीपक्षीय संबंधात आठ महिन्यांपुर्वी निर्माण झालेल्या युध्दजन्य परिस्थतीसंदर्भात चर्चा करण्याची शक्यता आहे. सप्टेंबर 30 पासून आजतागायत दोन्ही देशांत लष्करी पातळीवरील चर्चा सुरू आहे. मात्र, त्यातून सैन्य माघारी घेण्याचा निर्णय होऊ शकला नाही.
प्रत्यक्ष ताबा रेषेवर असणाऱ्या तणावाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण सैन्य माघारीचा तोडगा निघण्याच्या दिशेने पुढील चर्चा मदत करेल, सीमेवर संपूर्ण शांतता आणि तणावरहित स्थिती शक्य आहे, असे भारताचे पररराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी सांगितले.