भारत आणि चीनने चर्चेतून मार्ग काढावा

नवी दिल्ली : सीमेवर शांतता आणि स्थर्य कायम राखण्यासाठी भारत आणि चीनने संवादातून प्रश्न सोडवावे, असे मत चीनचे राजदूत सून वेईडोंग यांनी मंगळवारी व्यक्त केले आहे. चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग ११ ऑक्टोबरला दोन दिवसीय भारत दौऱ्यावर येणार असल्याच्या पाश्र्वभूमीवर वेईडोंग यांनी ही माहिती दिली.

ते म्हणाले की शेजारी देशांमध्ये अनेक मुद्यांवर वाद असणे साहजिक आहे. भारत आणि चीन यांनी याआधी प्रादेशिक पातळीवर अनेक प्रश्न सोडवले आहेत. सीमावादामुळे द्विपक्षीय संबंध बिघडू नये, याची काळजी दोन्ही देशांनी घ्यायला हवी. दरम्यान, चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग हे ११ आणि १२ ऑक्टोबर रोजी भारत दौऱ्यावर येणार आहेत. भारत आणि चीन बुधवारी या भेटीची अधिकृत घोषणा करणार आहेत.

जम्मू-काश्मीरबद्दल चीनची भूमिका स्पष्ट आणि कायम असल्याचे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी म्हटले आहे. काश्मीरसह सर्व प्रश्नांवर चर्चा करावी असे, आवाहन आम्ही भारत आणि पाकिस्ताला केले असल्याचे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते गेंग शुआंग यांनी मंगळवारी सांगितले. चीनचे पाकिस्तानमधील राजदूत जिंग यांनी काश्मीरबद्दल वक्तव्य केल्याबद्दल भारताने शनिवारी राजनैतिक मार्गाने निषेध नोंदवला होता.

Leave A Reply

Your email address will not be published.