मॉस्को : रशियाचे अध्यक्ष ब्लादिमिर पुतीन यांनी युक्रेनशी संभाव्य शांतता चर्चा करण्याच्या संदर्भात एक मोठे विधान केले आहे. रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दिलेल्या बातमीनुसार पुतीन म्हणाले की जर युक्रेनशी शांतता बोलणी झाली तर या संभाव्य शांतता चर्चेत भारत, चीन आणि ब्राझील हे तीन देश महत्वाची भूमिका बजावू शकतात.
युध्द सुरू झाल्यानंतर सुरवातीच्या काही आठवड्यांत इस्तंबूल येथे झालेल्या चर्चेत रशिया आणि युक्रेनच्या प्रतिनिधींमध्ये एक प्राथमिक स्वरूपाचा समझोता झाला होता. हा समझोता लागू केला गेला नाही, मात्र दोन्ही देशांदरम्यानच्या शांतता बोलणीसाठी हाच समझोता आधार होऊ शकतो असेही पुतीन यांनी म्हटले आहे.
पुतीन यांची ही भूमिका त्यांनाही आता युध्द थांबवायचे असल्याचे संकेत देत आहे. प्रदीर्घ काळापासून सुरू असलेल्या या युध्दात मोठी जीवितहानी झाली असून प्रचंड आर्थिक नुकसानही झाले आहे. तथापि, माघार घेण्यास कोणाची तयारी नसल्यामुळे युध्द लांबले आहे.
भारताकडून सुरूवातीपासूनच जागतिक समुदायाकडून हे युध्द रोखण्याच्या संदर्भात पुढाकार घेतला जाण्याची अपेक्षा व्यक्त केली जात होती. रशिया भारताचा पारंपरिक मित्र आहे व युक्रेनशहीही भारताचे चांगले संबंध आहेत. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी या दोन्ही देशांच्या राष्ट्रपुमुखांच्या अलिकडेच भेटी घेतल्या होत्या आणि भारत सर्वतोपरी मदत करण्यास तयार आहे अशा आशयाचे संकेत दिले होते. त्यानंतरच आता पुतीन यांनी ही भूमिका मांडली आहे.