मद्रिद : जागतिक पातळीवर सध्या सुरू असलेल्या संघर्षाला समाप्त करण्यासाठी भारत सकारात्मक चर्चा घडवण्यास सक्षम आहे, असे प्रतिपादन परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी केले आहे. रशिया-युक्रेन तसेच इस्रायल-इराण या प्रतिस्पर्धी बाजूंशी सकारात्मक चर्चा करण्याची क्षमता भारताकडे आहे, असे ते म्हणाले. स्पेन दौऱ्यादरम्यान स्पेनमदील भारतीय समुदायाशी जयशंकर यांनी आज संवाद साधला.
आज भारताकडे जागतिक चर्चेत योगदान देणारे म्हणून पाहिले जाते आहे. जेव्हा जग अनेक, अनेक आव्हाने, विविध समस्यांकडे पाहत असते, तेव्हा आपण कल्पना आणि नाविन्यपुर्ण उपक्रम देखील घेऊन येतो, या विषयावरील चर्चेमध्ये ते बोलत होते. आज खूप कमी देश आहेत जे रशिया आणि युक्रेन या दोन्ही देशांशी सकारात्मक संवाद साधण्याच्या स्थितीत आहेत, पंतप्रधान नरेंद्र मोदी गेल्या वर्षी दोनदा रशियाला भेट दिली आणि युक्रेनमधील कीवलाही गेले.
भारत हा अशा काही देशांपैकी एक आहे जो इस्रायल आणि इराणशीही बोलण्याच्या स्थितीत आहे. भारत क्वाड आणि ब्रिक्सचाही सदस्य असल्याने पंतप्रधान मोदी हे करू शकतात, असे ते म्हणाले. क्वॉडमध्ये ऑस्ट्रेलिया, जपान, अमेरिका आणि बारत आहे. तर ब्रिक्समध्ये आता ब्राझील, रशिया, भारत, चीन, दक्षिण आफ्रिका, इजिप्त, इथिओपिया, इंडोनेशिया, इराण आणि संयुक्त अरब अमिराती हे सदस्य आहेत. भारतानेच आफ्रिकन युनियनला जी-२० मध्ये आणले जे काही वर्षांपूर्वीच करायला हवे होते, असेही जयशंकर म्हणाले.
भारत आणि स्पेन २०२६ हे दुहेरी वर्ष म्हणून साजरे करतीलय या वर्षात दोन्ही देशांमध्ये संस्कृती, पर्यटन आणि कृत्रिम बुद्धिमत्ता साजरे करतील. गेल्या वर्षी स्पेनचे अध्यक्ष पेड्रो सांचेझ यांचा भारत दौरा खूप यशस्वी झाला आणि दोन्ही देशांनी त्यांचे संबंध पुढे नेण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत असा त्यांचा मोदींशी करार झाला असल्याचेही जयशंकर यांनी सांगितले. स्पेनमधील भारतीय समुदायाने भारताच्या संपर्कात रहावे आणि देशातील घडामोडींचा पाठपुरावा करावा, असे आवाहन देखील त्यांनी केले.
देशाच्या उल्लेखनीय कामगिरीवर प्रकाश…
भारतात दररोज २८ किलोमीटरचे महामार्ग बांधले जातात. गेल्या १० वर्षात देशातील विमानतळांची संख्या ७५ वरून १५० पेक्षा जास्त झाली आहे. भारतात मेट्रो ट्रेनची संख्या २०१४ मध्ये ६ होती, ती आज २१ झाली आहे आणि ती ६० शहरांमध्ये नेण्याची आमची योजना आहे. चंद्रयान-३ मोहिमेद्वारे चंद्राच्या दक्षिण बाजूला उतरण्यात यशस्वी झाल्यामुळे अंतराळ तंत्रज्ञानासारख्या क्षेत्रातील भारताच्या कामगिरीवरही परराष्ट्र मंत्र्यांनी प्रकाश टाकला.