India-Canada News : कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी कॅनडा आणि भारत यांच्यातील वाढत्या संघर्षादरम्यान पुन्हा एकदा प्रतिक्रिया दिली आहे. जस्टिन ट्रूडो यांनी मंगळवारी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट केली आहे.
युनायटेड किंगडमचे अर्थात ब्रिटनचे पंतप्रधान केयर स्टारर यांच्याशी आपण भारत सरकारशी संबंधित एजंट्सद्वारे कॅनडाच्या नागरिकांविरुद्धच्या लक्ष्यित मोहिमेबद्दल चर्चा केली असल्याचे त्यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे.
दोन्ही नेत्यांनी त्यांच्या नागरिकांची सुरक्षा सुनिश्चित करण्याची गरज आणि कायद्याचे राज्य राखणे आणि त्याचा आदर करणे याविषयी चर्चा केली. या गंभीर प्रकरणाचे निराकरण करण्यासाठी भारतासोबत सहकार्य करण्यात कॅनडाच्या सातत्यपूर्ण स्वारस्याचीही पंतप्रधान ट्रुडो यांनी नोंद घेतली असा दावा ट्रुडो यांनी पुढे केला आहे.
ओटावा येथे सोमवारी थँक्सगिव्हिंग डे वर पत्रकार परिषदेत आरसीएमपीचे सहाय्यक आयुक्त ब्रिजिट गौबिन यांनी भारतावर लॉरेन्स बिश्नोई टोळीसोबत कॅनडामध्ये दहशत पसरवल्याचा आरोप केला होता.
आम्ही जे पाहिले आहे ते संघटित गुन्हेगारी घटकांचा वापर आहे आणि त्याचे श्रेय सार्वजनिकरित्या एका संघटित गुन्हेगारी टोळीला दिले गेले आहे. लॉरेन्स बिश्नोई टोळीचा भारतातील एजंटशी संबंध आहे असा गंभीर आरोप त्यांनी केला.
कॅनडाच्या अधिका-यांनी सांगितले की, पंतप्रधान जस्टिन ट्रूडो हे भारताशी संबंधित कॅनडामधील हिंसक गुन्हेगारी कारवायांशी संबंधित ग्लोबल अफेयर्स कॅनडा आणि आरसीएमपीच्या तपासात्मक प्रयत्नांबद्दल पत्रकार परिषद घेणार आहेत.
या बाबत निश्चित वेळेची माहिती देण्यात आलेली नसली तरी त्यांनी सांगितले की, या पत्रकार परिषदेमध्ये पंतप्रधानांसह परराष्ट्र मंत्री मेलानी जोली आणि सार्वजनिक सुरक्षा मंत्री, लोकशाही संस्था आणि आंतरसरकारी व्यवहार मंत्री डॉमिनिक लेब्लँक यांचा समावेश असेल.
कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री म्हणतात, आमच्याकडे पुरावे भारताने सोमवारी कॅनडाच्या सहा राजनैतिक अधिकाऱ्यांची हकालपट्टी केली. याशिवाय भारताने कॅनडातून आपले उच्चायुक्त आणि इतर मुत्सद्दी आणि अधिकाऱ्यांना माघारी बोलावण्याची घोषणा केली आहे.
या अधिकाऱ्यांना कॅनडात लक्ष्य केले जात होते. याच दरम्यान, कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री मेलानी जोली यांनी मोठे वक्तव्य केले आहे. दोन्ही देशांच्या हितासाठी भारत सरकारने या तपासाला पाठिंबा द्यावा, अशी विनंती त्यांनी केली आहे.
भारताने घोषित केलेला दहशतवादी हरदीपसिंग निज्जर याच्या हत्येप्रकरणी रॉयल कॅनेडियन माउंटेड पोलिसांनी गोळा केलेल्या पुराव्यांच्या आधारे भारतीय मुत्सद्दींना बाहेर काढण्याचा निर्णय घेतला असल्याचे जोली यांनी म्हटले आहे. या तपासाला भारताने पाठिंबा द्यावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.