पाकिस्तान विरुद्ध न खेळताही भारत विश्वचषक जिंकू शकतो- हरभजन

नवी दिल्ली: आगामी विश्वचषकात पाकिस्तान विरुद्धचा साखळी फेरीतील सामना न खेळताही विश्वचषक जिंकण्याची क्षमता भारतीय संघात आहे. त्यामुळे भारतीय संघाने विश्वचषकातील पाकिस्तान विरुद्धचा सामना खेळू नये, असे मत भारताचा अनुभवी फिरकीपटू हरभजन सिंगने पुलवामा दहशतवादी हल्ल्‌याच्या पार्श्वभूमीवर एका खाजगी वाहिनीशी बोलताना व्यक्त केले आहे.

एकदिवसीय विश्वचषकाची सुरुवात 30 मे पासून होणार असून यावेळी विश्वचषकाचे यजमानपद इंग्लंडकडे आहे. या स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांचा सामना 16 जून रोजी मॅंचेस्टर येथील ओल्ड ट्राफल्ड मैदानावर होणे निश्‍चित आहे. स्पर्धेचे स्वरूप पाहता भारतीय संघाने पाकिस्तान विरुद्धचा सामना खेळला नाही आणि अन्य सामने जिंकले तरी भारतीय संघ पुढील फेरीत जाऊ शकतो. त्यामुळे भारतीय संघाने पाकिस्तान विरुद्धचा सामना खेळू नये अशा चर्चांना उधाण आले आहे.

हरभजन पुढे म्हणाला, दहशतवादी हल्ला झालेला हा प्रसंग खूप कठीण आहे. हे कृत्य खूप चुकीचे असून विचार करण्याच्यापलीकडील आहे. यावर सरकारने कठोर पाऊले उचलली पाहिजेत. उभय देशातील क्रिकेटबद्दल सांगायचे झाले तर भारताने त्यांच्यासह खेळणे टाळावे. जर आपण असे केले नाही तर ते पुन्हा असे कृत्य करत राहतील. मला नाही वाटत की, भारताने विश्वचषकात त्यांच्यासह सामना खेळावा. आपणाला आपल्या देशाच्या पाठीशी उभे राहण्याचे गरज आहे. क्रिकेट, हॉकी आणि अन्य कोणत्याही प्रकारचा खेळ त्यांच्यासह खेळू नये. त्यांच्याविरुद्धच्या लढतीला सामोरे न जाता आपण विश्वचषक उंचावू शकतो. त्यामुळे सैनिकांच्या बलिदानांचा मान राखत आपण खेळणे टाळले पाहिजे.

भारतीय संघाकडे विश्वचषकाचा प्रबळ दावेदार म्हणूण पहिले जात आहे. भारतीय संघाने मागील काही एकदिवसीय मालिकांमध्ये दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज, श्रीलंका ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड सारख्या मातब्बर संघावर मात करत मालिका जिंकल्या आहेत. दक्षिण आफ्रिकेला त्यांच्यात भूमीत 6-1 अशी धूळ चारली तर न्यूझीलंडला 4-1 असे पराभूत करत भारताने विदेशी भूमीवर स्वतःला उत्तम संघ म्हणून सिद्ध केले आहे. मागील इंग्लंड दौऱ्यात भारताला मानहानीकारक पराभव स्वीकारावा लागला असला तरी 2011 विश्वचषक जिंकल्यानंतर इंग्लंडमध्ये झालेल्या आयसीसीच्या स्पर्धांमध्ये भारताची कामगिरी वाखाणण्याजोगी राहिली आहे. 2013 मध्ये झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात भारताने यजमान इंग्लंडला पराभूत करत चॅम्पियन्स ट्रॉफी पटकाविली होती. 2017 मध्ये झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफमध्ये भारताने अंतिम सामन्यापर्यंत धडक मारली होती; परंतू तेथे पाकिस्तान विरुद्ध भारताला धक्कादायक पराभव स्वीकारावा लागल्याने उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते.

 

Leave A Reply

Your email address will not be published.