#SLvIND 2nd ODI : चहरचा कहर : भारताने मालिका जिंकली

कोलंबो – अखेरच्या षटकापर्यंत रोमहर्षक ठरलेल्या सामन्यात आठव्या क्रमांकावर फलंदाजीला येत अफलातून खेळी करत दीपक चहरने श्रीलंकेच्या हातातून सामना खेचून आणत भारतीय संघाला मालिका विजय मिळवून दिला. या सामन्यात भारताने श्रीलंकेवर 3 गडी राखून मात करत तीन सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे.

श्रीलंकेने विजयासाठी दिलेल्या 276 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताच्या प्रमुख फलंदाजांनी निराशा केली. सूर्यकुमार यादवने अर्धशतक फटकावले. मात्र, तो बाद झाल्यावर पराभव दिसू लागला होता. त्यावेळी दीपक चहरने सामन्याची सूत्रे आपल्या हाती घेत स्वप्नवत खेळी केली. त्याने 82 चेंडूत नाबाद 69 धावांची खेळी करताना 7 चौकार व 1 षटकार फटकावला. त्याला सुरेख साथ देताना भुवनेश्‍वर कुमारनेही उपयुक्त 19 धावांची खेळी केली. या जोडीने आठव्या गड्यासाठी नाबाद 84 धावांची भागीदारी करत संघाचा विजय साकार केला.

तत्पूर्वी, श्रीलंकेने भारताविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात 9 बाद 275 धावा केल्या. मालिका विजयासाठी भारताला 276 धावा करण्याचे आव्हान ठेवले होते. या सामन्यातही श्रीलंकेचा कर्णधार दासून शनाकाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी प्रमुख फलंदाजांच्या कामगिरीमुळे 50 षटकांत 9 बाद 275 धावा केल्या. श्रीलंकेकडून चरिथ असालांकाने 65 तर, सलामीवीर अविष्का फर्नांडोने 50 धावा करत संघाला मोठ्या धावसंख्येचा पाया रचून दिली. सलामीवीर फर्नांडो आणि मिनोद भानुका यांनी 77 धावांची सलामी दिली. हे दोघे खेळत असताना भारतीय गोलंदाज दडपणाखाली आले होते. मात्र, कर्णधार शिखऱ धवनने केलेला गोलंदाजीतील बदल कलाटणी देणारा ठरला.

लेग स्पीन गोलंदाज यजुवेंद्र चहलने भानुकाला 36 धावांवर बाद करत श्रीलंकेला पहिला धक्का दिला. लगेचच याच षटकातील दुसऱ्या चेंडूवर त्याने भानुका राजपक्षेलाही बाद केले. यावेळी यजमान संघाची अवस्था 2 बाद 77 अशी झाली. त्यानंतर धनंजय डी सिल्वासह फर्नांडोने डाव सावरत संघाचे शतक फलकावर लावले. पहिल्या सामन्यात एकही बळी मिळवता न आलेल्या भुवनेश्‍वर कुमारने फर्नांडोला 50 धावांवर बाद केले. त्यानंतर डीसिल्वाही 32 धावांवर बाद झाला. कर्णधार दासून शनाकानेही निराशा केली. प्रमुख फलंदाज बाद होत असताना चरिथ असालंकाने एकहाती किल्ला लढवला.

मात्र, अर्धशतकानंतर धावांचा वेग वाढवण्याच्या प्रयत्नात तो भुवनेश्‍वरच्याच गोलंदाजीवर 65 धावांवर बाद झाला. त्याचवेळी करुणारत्नेने पुन्हा एकदा पहिल्या सामन्याप्रमाणे याही सामन्यात तळात फलंदाजी करताना भारताच्या गोलंदाजीवर हल्ला चढवला. त्याचे अर्धशतक पुन्हा एकदा हुकले. मात्र, त्याने 44 धावांची खेळी करत संघाला 274 धावांची मजल मारून दिली. भारताकडून चहल व भुवनेश्‍वर यांनी प्रत्येकी 3 गडी बाद केले. त्यांना सुरेख साथ देताना दीपक चहरने 2 बळी मिळवले.

संक्षिप्त धावफलक –

श्रीलंका – 50 षटकांत 9 बाद 275 धावा. (चरिथ असालंका 65, अविष्का फर्नांडो 50, चमिका करुणारत्ने 44, मिनोद भानुका 36, धनंजय डीसिल्व्हा 32, दासून शनाका 16, यजुवेंद्र चहल 3-50, भुनेश्‍वर कुमार 3-54, दीपक चहर 2-53). भारत – 49.1 षटकांत 7 बाद 277 धावा. (सूर्यकुमार यादव 53, मनीष पांडे 37, शिखऱ धवन 29, कृणाल पंड्या 35, दीपक चहर नाबाद 69, भुवनेश्‍वर कुमार नाबाद 19, वनिंदू हसरंगा 3-37).

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.