#CWC19 : मँचेस्टरमध्ये ‘फादर्स डे’ जल्लोषात, विश्वचषकात भारताचा पाकवर सातव्यांदा विजय

पावसामुळे निकाल डकवर्थ लुईसच्या आधारे, पाकला आव्हान पेलवले नाही

मॅंचेस्टर – फलंदाजांनंतर गोलंदाजांनी केलेल्या धमाकेदार कामगिरीच्या बळावर भारताने पाकिस्तानचा 89 धावांनी पराभव केला. पाकिस्तानवर भारताने विश्‍वचषक स्पर्धेत मिळवलेला हा सलग सातवा विजय होता. त्या अर्थाने भारताने फादर्स डेच्या दिवशी पाकिस्तानवरील आपले श्रेष्ठत्व सिद्ध केले.

नाणेफेक गमावून भारताने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 50 षटकांत 5 बाद 336 धावांची मजल मारत पाकिस्तानसमोर विजयासाठी 337 धावांचे लक्ष्य ठेवले. यानंतर पाकिस्तानच्या फलंदाजी वेळी सामन्यात पावसाचा व्यत्यय आल्याने पाकिस्तानला 40 षटकांत 302 धावांचे सुधारीत लक्ष्य देण्यात आले होते. मात्र, पाकिस्तानला 40 षटकांत 6 बाद 212 धावांचीच मजल मारता आली.

यावेळी 337 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायला उतरलेल्या पाकिस्तानचा संघ सुरूवाती पासुन दबावात खेळत होता. त्यातच भुवनेश्‍वर कुमार डावाचे चौथे षटक टाकत असताना जायबंदी झाल्याने मैदान सोडल्याने भारताची चिंता वाढली. मात्र, भुवनेश्‍वरचे षटक पूर्ण करण्यासाठी आलेल्या विजय शंकरने पाकला आपल्या पहिल्याच चेंडूवर पहिला धक्का दिला. त्याने इमाम-उल-हकला 7 धावांवर असताना पायचीत बाद केले. यावेळी आपला पहिला विश्‍वचषक सामना खेळताना पहिल्याच चेंडूवर गडी बाद करणारा तो पहिला भारतीय गोलंदाज ठरला.

त्यानंतर पाकिस्तानच्या फखर जमान आणि बाबर आझम यांनी संघाचा डाव सावरायला सुरूवात केली. या दोघांनी सावध फलंदाजी करत 21.4 षटकांत संघाचे शतक बोर्डावर लावले. यावेळी दोघांनीही बचावात्मक पवित्रा सोडून आक्रमक फलंदाजी करत दुसऱ्या विकेटसाठी शतकी भागिदारी नोंदवली. मात्र, संघाच्या 117 धावा झाल्या असताना कुलदीप यादवने बाबर आझमला 48 धावांवर बाद करत ही जमलेली जोडी फोडली. बाद होण्यापुर्वी आझम आणि झमान यांनी 19.1 षटकांत 104 धावांची भागिदारी नोंदवली. बाबर बाद झाल्यानंतर इतकावेळ सावध फलंदाजी करणारा फकर झमान देखील 62 धावा करुन बाद झाल्याने पाकिस्तानला तिसरा धक्‍का बसला.

या दोन विकेट पडल्यानंतर पाकिस्तान बॅकफूटवर गेला. त्यातच हार्दिक पांड्याने लागोपाठ दोन चेंडूंवर अजून दोन धक्के देत पाकिस्तानचा डाव आणखीनच संकटात आणला. त्याने हाफिजला 9 धावांवर आणि शोएब मलिकला शुन्यावर बाद केले. यामुळे पाकिस्तानची अवस्था 22 षटकांत 1 बाद 116 धावांवरुन 27 षटकांत 5 बाद 129 अशी झाली.

यानंतर गोलंदाजीस आलेल्या विजय शंकरने पाकिस्तानचा कर्णधार सर्फराज अहमदला 12 धावांवर बाद करत पाकिस्तानला सहावा धक्‍का दिला. सर्फराज बाद झाल्यानंतर पुन्हा एकदा पावसाला सुरूवात झाल्याने खेळ काही काळ थांबवण्यात आला तेंव्हा पाकिस्तानने 35 षटकांत 6 बाद 166 धावा केल्या होत्या. यानंतर खेळ सुरू झाल्यानंतर पाकिस्तानसमोर विजयासाठी 40 षटकांत 302 धावांचे सुधारीत लक्ष्य ठेवण्यात आले. मात्र, पाकिस्तानला 40 षटकांत 6 बाद 212 धावांचीच मजल मारता आली.

संक्षिप्त धावफलक –

भारत 50 षटकांत 5 बाद 336 (रोहित शर्मा 140, विराट कोहली 77, लोकेश राहुल 57) पाकिस्तान 40 षटकांत 6 बाद 212 (फकर झमान 62, बाबर आझम 48, विजय शंकर 2-22).

Leave A Reply

Your email address will not be published.