#INDvPAK : यशस्वीचे शतक; पाकला धूळ चारत भारत अंतिम फेरीत

पोटचेफ्स्टूम : सलामीवीर यशस्वी जैस्वालच्या नाबाद शतकी आणि दिव्यांश सक्सेनाच्या नाबाद अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारताने आयसीसी १९ वर्षाखालील विश्‍वचषक क्रिकेट स्पर्धेच्या पहिल्या उपांत्य फेरीच्या साामन्यात पारंपारीक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा १० विकेटनी धुव्वा उडवला. या विजयासह भारताने अंतिम फेरीत धडक मारली आहे. यशस्वी जैस्वाल सामन्याचा मानकरी ठरला.

विजयासाठी १७३ धावांचे लक्ष्य भारतीय संघाने ३५.२ षटकात बिनबाद १७६ धावा करत सहज पूर्ण केले. भारतीय संघाकडून सलामीवीर यशस्वी जैस्वालने ११३ चेंडूत ८ चौकार व ४ षटकारासह नाबाद १०५ तर दिव्यांश सक्सेनाने ९९ चेंडूत ६ चौकारासह ५९ धावांची खेळी करत भारतीय संघास विजय मिळवून दिला. पाकिस्तानच्या एकाही गोलंदाजांला गडी बाद करण्यात यश आले नाही आणि भारताने पाकला पराभूत करत यशस्वीपणे अंतिम फेरी गाठली.

तत्पूर्वी, पाकिस्तानचा कर्णधार रोहेल नजीरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्विकारली होती. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने हैदर अलीच्या ५६(७७), रोहेल नजीरच्या ६२(१०२) आणि मोहम्मद हारिसच्या २१(१५) धावांच्या खेळीच्या जोरावर ४३.१ षटकांत सर्वबाद १७२ अशी मजल मारली होती. या तिन्ही फलंदाजांशिवाय एकालाही दुहेरी धावसंख्या गाठता आली नाही.

भारतीय संघाकडून गोलंदाजीत सुशांत मिश्राने ८.१ षटकांत २८ धावा देत सर्वाधिक ३ गडी बाद केले. कार्तिक त्यागीने ८ षटकांत ३२ धावा देत २, रवि बिश्नोईने १० षटकात ४६ धावा देत २, अथर्वा अन्कोलेकरने ७ षटकांत २९ धावा देत १ आणि यशस्वी जैस्वालने ३ षटकांत ११ धावा देत १ गडी बाद केला.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.