अहमदाबाद – कर्णधार विराट कोहली रनमशीन या नावाला जागला आणि नाबाद अर्धशतकी खेळी केली. त्याला सुरेख साथ देताना नवोदित इशान किशननेही जबाबदारीने अर्धशतक फटकावले. या दोघांच्या आक्रमक फलंदाजीच्या जोरावर भारताने दुसऱ्या टी-20 सामन्यात इंग्लंडचा 7 गडी राखून पराभव केला व पाच सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी केली.
इंग्लंडने दिलेले लक्ष्य केवळ 18 व्या षटकांत 3 गडी गमावून 166 धावा करत सामना जिंकला. भारताच्या डावाची सुरूवात खराब झाली. सलामीवीर लोकेश राहुल खाते उघडण्यापूर्वीच तंबूत परतला. त्यानंतर कर्णधार कोहलीने इशानच्या साथित 93 धावांची भागीदारी करत संघाचा डाव सावरला. किशनने आक्रमक अर्धशतक फटकावले मात्र, अनावश्यक रिव्हर्स स्विप मारण्याच्या प्रयत्नात तो बाद झाला.
त्यानंतर भरात असलेल्या ऋषभ पंतने कोहलीला सुरेख साथ दिली. मात्र, तो देखील विनाकारण फटका मारून बाद झाला. या जोडीने 36 धावांची भागीदारी करत संघाला विजयासमिप नेले. भरात असलेल्या श्रेयस अय्यरनेही कोहलीला साथ दिली.
दरम्यान कोहलीनेही आपले अर्धशतक पूर्ण करत आक्रमक फलंदाजी केली. त्याने 18 व्या षटकांतील 5 व्या चेंडूवर षटकार फटकावून संघाच्या विजयासर शिक्कामोर्तब केले. त्याने आपल्या नाबाद 73 धावांच्या खेळीत 49 चेंडूत 5 चौकार व 3 षटकार अशी आतषबाजी केली. अय्यर 8 धावांवर नाबाद राहिला. इंग्लंडकडून सॅम कुरेन, ख्रिस जॉर्डन व आदील रशिद यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
तत्पूर्वी, भारताचा कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकत पाहुण्यांना प्रथम फलंदाजी देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी केलेल्या अचूक माऱ्यासमोर इंग्लंडच्या प्रमुख फलंदाजांना अपयश आल्याने त्यांना भारताविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यात केवळ 164 धावाच करता आल्या. इंग्लंडकडून कर्णधार इयॉन मॉर्गनने 28, बेन स्टोक्सने 24, डेव्हीड मलानने 24 आणि जॉनी बेयरस्टोने 20 धावा केल्या. यष्टीरक्षक जोस बटलर शून्यावर बाद झाला.
भारताकडून गोलंदाजीत शार्दुल ठाकूर आणि वाॅश्गिंटन सुंदरने प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. शार्दुलने 4 षटकांत 29 तर सुंदरनेही 4 षटकांत 29 धावा दिल्या. याव्यतिरिक्त भुवनेश्वर कुमार आणि युजवेंद्र चहल यांनी प्रत्येकी 1 विकेट्स घेतली.
संक्षिप्त धावफलक –
इंग्लंड – 20 षटकांत 6 बाद 164 धावा. (जेसन रॉय 46, इयान मॉर्गन 28, बेन स्टोक्स 24, डेव्हिड मलान 24, जॉनी बेअरस्टो 20, वॉशिंग्टन सुंदर 2-29, शार्दुल ठाकूर 2-29, भुवनेश्वर कुमार 1-28, यजुवेंद्र चहल 1-34). भारत – 17.5 षटकांत 3 बाद 166 धावा. (ऋषभ पंत 26, इशान किशन 56, विराट कोहली नाबाद 73, श्रेयस अय्यर नाबाद 8, सॅम कुरेन 1-22, ख्रिस जॉर्डन 1-38, आदिल रशिद 1-38).