पर्थ – भारतीय हॉकी संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर पाच सामन्यांच्या हॉकी मालिकेसाठी दाखल झाला असून भारतीय संघाने स्पर्धेतील पहिले दोन्ही सामने जिंकत धडाकेबाज सुरूवात केली असून दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाने ऑस्ट्रेलिया अ संघाचा 3-0 असा एकतर्फी पराभव करत आपली विजयी आगेकूच कायम राखली.
सुमित कुमार ज्युनियर आणि रुपिंदर पाल सिंगने केलेल्या गोलच्या बळावर भारतीय हॉकी संघाने सामना 3-0 अशा फरकाने आपल्या नावे केला. यावेळी सामन्याच्या पहिल्या मिनिटापासूनच भारतीय संघाने वर्चढ खेळ करत ऑस्ट्रेलिया अ संघावर दडपण वाढवले होते. त्यामुळे संओपुर्ण सामन्यात भारतीय संघाकडेच चेंडू जास्त वेळ राहिला होता. यावेळी दुखापतीमुळे जवळपास आठ महिणे संघा बाहेर असणाऱ्या रुपिंदर पाल सिंगने सामन्याच्या सहाव्याच मिनिटाला गोल करत भारताला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. यानंतर भारतीय संघाने पहिल्या सत्रात सर्व वेळ चेंडू ऑस्ट्रेलिया अ संघाच्या गोलजाळी जवळ खेळवल्याने ऑस्ट्रेलिया अ संघातील खेळाडूंना दडपणात आणले.
यावेळी भारतीय संघातील बचाव फळीतील हरमनप्रीत सिंगने ऑस्ट्रेलियन संघातील खेळाडूंच्या ताब्यातील चेंडू कसबदारपणे आपल्या ताब्यात घेत भारतीय संघचा कर्णधार मनप्रीत सिंगच्या ताब्यात दिला. मनप्रीतने हा चेंडू गोल जाळीकडे नेत सुमित कुमार ज्युनियर कडे टोलावला. सुमितने मिलालेल्या पासचा सदउपयोग करत भारतीय संघासाठी दुसऱ्या गोलची नोंद करत संघाची आघाडी 2-0 अशी केली.
तर, यानंतरच्या दुसऱ्याच मिनिटाला भारतीय संघाने आणखीन एक गोल नोंदवत ऑस्ट्रेलिया अ संघाला आश्चर्याचा धक्का देत आपला विजय जवळपास निश्चीत केला. यावेळी दुसऱ्या गोल प्रमाणेच सुमित कुमार ज्युनियरने मिळालेल्या संधीचे सोने करत ऑस्ट्रेलिया अ च्या गोलरक्षकाला चकवत संघाचा विजयी गोल झळकावला.
यावेळी संपुर्ण सामन्यात ऑस्ट्रेलिया अ संघाला गोल करण्याची केवळ एकच संधी मिळाली ती म्हणजे दुसऱ्या सत्रात भारताच्या बचावफळीच्या ताब्यातील चेंडू हिसकावून त्यांच्या आघाडीच्या फळीने गोलच्या दिशेने फतकावलेला चेंडू तरुण गोलरक्षक कृष्णा पाठकने गोलजाळीत जाण्यापासून रोखत भारतीय संघाला सामन्यात एकतर्फी विजय मिलवून दिला.