टिकटॉकसह 59 चिनी अ‍ॅप्सवर भारताची बंदी; गुगलनेही घेतला मोठा निर्णय

नवी दिल्ली – केंद्र सरकारने धडक पाऊल उचलत टिकटॉकसोबतच शेअर इट, हॅलो, यूसी ब्राऊजर, लाइकी आणि व्ही-चॅट या चिनी अ‍ॅप्सवर बंदी घातली आहे. त्यातून भारताने चीनला जोरदार डिजिटल दणका दिल्याचे मानले जात आहे. या पार्श्वभूमीवर गुगलनेही मोठा निर्णय घेतला आहे.

चीनमधील या अ‍ॅप्सवर बंदी घालण्यात आली तरीही गुगल प्ले स्टोअरवर ही अ‍ॅप्स दिसत होती. त्याच अनुषंगाने आता गुगलने ही सगळी चिनी अ‍ॅप्स ब्लॉक करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय तात्पुरत्या स्वरुपाचा आहे, असेही गुगलने स्पष्ट केले आहे.

दरम्यान, देशाचे सार्वभौमत्व, अखंडत्व यांच्याबरोबरच राष्ट्रीय सुरक्षेसाठी अपायकारक ठरू शकणाऱ्या अ‍ॅप्सवर बंदी घालत असल्याचे माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने स्पष्ट केले. बंदी घालण्यात आलेल्या अ‍ॅप्समध्ये यूसी ब्राऊजर, हॅलो, लाइकी, क्‍लब फॅक्‍टरी, न्युज डॉग, यूसी न्युज, वीबो, जेंडर आदींचाही समावेश आहे. संबंधित अ‍ॅप्स ब्लॉक करण्याची शिफारस केंद्रीय गृह मंत्रालय आणि सायबर गुन्हे समन्वय केंद्राकडूनही करण्यात आली होती. चीनकडून सातत्याने केल्या जाणाऱ्या कुरापतींमुळे सध्या सीमेवर तणावाची स्थिती आहे. त्यामुळे देशात चीनविरोधात संतापाचे वातावरण आहे. अशात अनेक अॅप्सवर बंदी घालून भारताने त्या देशाला कठोर संदेश दिला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.