महिला हाॅकी : भारताची बलाढ्य ऑस्ट्रेलियाशी बरोबरी

टोकियो – उत्कंठापूर्ण लढतीत 0-1 गोलने पिछाडीवर असलेल्या भारताने बलाढ्य ऑस्ट्रेलियास 2-2 असे रोखले आणि येथे सुरू असलेल्या ऑलिंपिक टेस्ट इव्हेन्टमधील महिलांच्या हॉकीत आश्‍चर्यजनक निकाल नोंदविला.

भारताकडून वंदना कटारिया (36 वे मिनिट) व गुरजित कौर (59 वे मिनिट) यांनी प्रत्येकी एक गोल केला. ऑस्ट्रेलियाकडून कॅटलीन नॉब्ज (14 वे मिनिट) व ग्रेस स्टेवर्ट (43 वे मिनिट) यांनी गोल नोंदविले. भारताने अव्वल साखळीतील पहिल्या सामन्यात जपानवर 2-1 असा विजय मिळविला होता. साखळी गटातील शेवटच्या लढतीत मंगळवारी भारताचा चीन संघाशी गाठ पडणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

ऑलिंपिक व जागतिक स्पर्धांमध्ये वर्चस्व गाजविणाऱ्या ऑस्ट्रेलियाने सामन्याच्या सुरूवातीपासून धडाकेबाज खेळ केला. भारतीय खेळाडूंनी चांगल्या चाली केल्या. तथापि पहिली 14 मिनिटे गोलफलक कोराच होता. 14 व्या मिनिटाला ऑस्ट्रेलियास पेनल्टी स्ट्रोकची संधी मिळाली. त्याचा फायदा घेत नॉब्जने अचूक फटका मारला आणि संघाचे खाते उघडले. भारताने बरोबरीसाठी खूप चाली केल्या. मात्र ऑस्ट्रेलियाच्या बचाव रक्षकांनी या चाली असफल ठरविल्या. पूर्वार्धात ऑस्ट्रेलियाने 1-0 अशी आघाडी घेतली होती.

उत्तरार्धाच्या भारतीय खेळाडूंनी जोरदार आक्रमण केले. अखेर सामन्याच्या 36 व्या मिनिटाला त्यांच्या या चालीस यश लाभले. कटारियाने सुरेख गोल करीत 1-1 अशी बरोबरी साधली. ही बरोबरी फार वेळ टिकली नाही. 43 व्या मिनिटाला ऑस्ट्रेलियाच्या स्टेवर्टने भारताची गोलरक्षक सविताला चकवित गोल केला आणि संघास 2-1 अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर भारतीय खेळाडूंनी सातत्याने चाली केल्या. अखेर 59 व्या मिनिटाला गुरजितला गोल करण्याची संधी मिळाली. तिने अप्रतिम फटका मारला आणि संघाचा दुसरा गोल केला. याच 2-2 अशा बरोबरीत सामना संपला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)