दुबई -आयसीसी टी-20च्या क्रमवारीत भारताने दुसरे स्थान कायम राखले आहे. परंतु एकदिवसीय सामन्यात भारताची तिसऱ्या स्थानावर घसरण झाली आहे. टी-20 क्रमवारीत भारत अव्वल स्थानावर असलेल्या इंग्लंडपेक्षा (277) पाच गुणांनी पिछाडीवर आहे.
वेस्ट इंडिज, पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया आणि बांगलादेशवर मालिका जिंकल्यानंतर न्यूझीलंडने टी-20च्या क्रमवारीत पाचव्या स्थानावरून तिसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. तर ऑस्ट्रेलिया तिसऱ्या स्थानावरून पाचव्या स्थानावर पोहोचला आहे. तसेच श्रीलंका आणि बांगलादेशने प्रत्येकी एका स्थानाची सुधारणा करत अनुक्रमे आठवे व नववे स्थान मिळविले आहे, तर वेस्ट इंडिज दोन स्थान खाली घसरून दहाव्या स्थानावर आहे.
वनडे रॅंकिंगमध्ये केन विलीयमसनच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या न्यूझीलंड संघाला मोठा फायदा झाला आहे. न्यूझीलंडने नुकतेच बांगलादेशविरुद्ध झालेल्या वनडे मालिकेत 3-0 असा विजय मिळविला होता. याचाच फायदा घेत न्यूझीलंड संघाने 121 रेटिंग पॉइंट्ससह यादीत पहिले स्थान गाठले. ही वनडे रॅंकिंग 1 मे 2018 नंतर झालेल्या सामन्यांच्या निकालावरून जाहीर करण्यात आली आहे.
2018 आणि 2019 मध्ये झालेल्या सामन्यांच्या निकालातून 50 टक्के आणि 2020 मध्ये झालेल्या सामन्यांच्या निकालांवरून ही क्रमवारी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये विश्वचषक 2019 स्पर्धेचाही समावेश आहे. आतापर्यंत इंग्लंड या यादीत सर्वोच स्थानी होता. परंतु आता न्यूझीलंडने बाजी मारली आहे. या यादीत सर्वोच्च स्थानी असलेला इंग्लंडची चौथ्या स्थानी घसरण झाली आहे. तसेच भारतीय संघ तिसऱ्या स्थानी, तर ऑस्ट्रेलिया दुसऱ्या स्थानी विराजमान झाला आहे.